Loksabha 2019 ः कोणीच कोणाचे ऐकेना! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे.

अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपने इतर पक्षांतून येणाऱ्यांसाठी पायघड्या अंथरण्याचा सपाटा लावल्याचे दिसते आहे. केंद्रात स्पष्ट बहुमत मिळविलेल्या पक्षाला उमेदवारांसाठी इतर पक्षांवर अवलंबून का राहावे लागते आहे, हा प्रश्‍नच आहे. अर्थात, कोणे एके काळी राजकीयदृष्ट्या वजनदार आणि पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसबरोबर असलेल्या विखे घराण्यातील नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची ही पहिलीच वेळ नाही! पाच वेळा काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी पटकवणारे आणि संसद सदस्य नसतानाही नगर जिल्ह्यात कायमच ‘खासदार’ म्हणूनच ओळखले जाणारे बाळासाहेब विखे हे सुजयचे आजोबा. त्यांनीही अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना, ‘शिवबंधन’ बांधून केंद्रात राज्यमंत्रिपद पटकवले होते! तर, सुजयचे पिताश्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत शिवसेनेत जाऊन मंत्रिपद मिळवले होते. त्यामुळे ‘विखे’ नावाची घराणेशाही सुरू ठेवण्यासाठी सुजयनेही तोच पर्याय स्वीकारला आहे! महाराष्ट्रातील आणखी एका मातब्बर अशा ‘पवार’ घराण्यातील तिसऱ्या पिढीलाही संसदीय राजकारणात जाण्याची ऊर्मी आल्यामुळे दस्तूरखुद्द शरद पवार यांच्यावर निवडणूक न लढवण्याची वेळ आली. पवार यांच्या माढ्यातून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्याची फुले फुलली; पण त्याच वेळी त्यांचे चिरंजीव रणजितसिंह हेही भाजपचे दार ठोठावत असल्याच्या बातम्या झळकल्या. याचा अर्थ स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते; याचे कारण अन्य भाजपेतर पक्षांतही या रोगाची लागण झाल्याचे दिसते.

लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला १० मार्चला.मात्र, त्याआधी म्हणजे पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी भाजपविरोधात काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’च नव्हे, तर अन्य छोट्या पक्षांचीही बलदंड आघाडी होईल, असे चित्र होते. मात्र, गेल्या आठवडाभरात हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने मराठवाड्यात दोन सभा घेऊन, आघाडीचे सूतोवाच केले खरे; पण त्यास जवळपास पंधरवडा उलटला, तरी अद्याप चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. त्याचे कारण ‘आमचीच कॉलर’ ताठ, असे दाखवण्यासाठी सुरू झालेल्या कुरघोडीच्या राजकारणात आहे. तिकडे, छत्रपती उदयनराजे यांच्या कॉलर उडवण्याच्या ‘स्टाईल’ची मध्यंतरी नक्‍कल करून पवारांनी टाळ्या घेतल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती आता या राज्यातील दोन पक्षांचे बडे नेते करताहेत. त्यामुळे नगर असो, औरंगाबाद असो, की पुणे, अशा काही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. ‘राष्ट्रवादी’ नगरची जागा काँग्रेसला सोडायला तयार नाही, हेच सुजय विखे भाजपमध्ये जाण्याचे कारण असले, तरी त्यामुळे राज्यातील बहुतेक बड्या राजकीय घराण्यांची चाल कशी आहे, ते बघायला मिळाले. ‘बहुजन वंचित आघाडी’चे नेते प्रकाश आंबेडकरही अधिकाधिक जागांचा हट्ट सोडायला तयार नाहीत. एकीकडे आपण संघपरिवार, हिंदुत्ववाद, भाजप यांच्या विरोधात आहे, असे दाखवायचे आणि प्रत्यक्ष वर्तन त्या परिवाराला मदत होईल, असे करायचे, असा हा  प्रकार. त्यांची असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’बरोबर आघाडी आहे. तरीही त्यांनी माजी न्या. कोळसे-पाटील यांची उमेदवारी औरंगाबादेतून जाहीर करताच तेथील ‘एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील यांनी बंडाचे निशाण फडकवले. मार्क्‍सवाद्यांनीही दिंडोरी, तसेच पालघर अशा दोन जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे मागून, भाजपविरोधातील राजकारणात खो घालण्याचा पवित्रा घेतला आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतरही भाजपविरोधात मजबूत आघाडी करण्याचे मनसुबे रचणाऱ्या या सर्वच पक्षांना या न ऐकण्याच्या रोगाची लागण  झाली आहे. राजू शेट्टी, महादेव जानकरही अपवाद नाहीत. शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सामील होतील, असे दोन आठवडाभरापूर्वीचे चित्र होते. त्यांनीही ताकदीपेक्षा अधिक जागा मागण्याचा हेका कायम ठेवला आहे. आपल्या पदरात अधिकाधिक जागा पडाव्यात म्हणून आघाडीच्या राजकारणात सर्वच पक्ष प्रयत्न करीत असतात, हे मान्य केले, तरीही या वेळी सुरू असलेला घोळ आता तमाशाची जागा घेऊ पाहत आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनी या सर्वांना समजावले आणि त्यांचे ऐकायची तयारी इतरांनी ठेवली, तरच ही आघाडी भाजपपुढे आव्हान उभे करू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 maharashtra politics in editorial