Loksabha 2019 : केंद्रातील सत्ता ठरविणार पूर्व किनारपट्टीवरील राज्ये

Loksabha 2019 : केंद्रातील सत्ता ठरविणार पूर्व किनारपट्टीवरील राज्ये

अनेक वादळांना समर्थपणे तोंड देणाऱ्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांनी गेल्या निवडणुकीत देशात विशेषतः उत्तर भारतात त्सुनामी ठरलेली मोदी लाटही मोठ्या खंबीरपणे थोपवली होती. या राज्यांत प्रादेशिक पक्षांनीच 90 टक्के जागा व्यापल्या होत्या. यावेळी या भागात मोठा वाटा हस्तगत करण्यासाठी भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. तरी देखील प्रादेशिक पक्षांनी त्यांच्या जागा राखण्यात यश मिळविल्यास त्रिशंकू ठरण्याची शक्‍यता असलेल्या नवीन लोकसभा सभागृहात त्यांना मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. 

देशाच्या पूर्व किनारपट्टीवर पश्‍चिम बंगाल, ओरिसा, आंध्रप्रदेश, त्यालगतचे तेलगंणा, तमिळनाडू ही राज्ये आहेत. या सर्व राज्यांत गेल्या वेळी राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप व काँग्रेसला अत्यल्प जागा मिळाल्या. ही सर्व राज्ये प्रादेशिक पक्षांच्या ताब्यात आहेत. या पाच राज्यांतील एकूण 144 जागांपैकी 129 जागा प्रादेशिक पक्षांनी जिंकल्या. भाजपच्या वाट्याला आठ जागा, काँग्रेसकडे सहा, तर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे दोन जागा होत्या. यावेळीही या राज्यांत प्रादेशिक पक्षांचाच बोलबाला असला, तरी भाजपच्या जागा वाढणार आहेत. 

मुख्यमंत्र्यांचा वरचष्मा 
या राज्यांतील मुख्यमंत्र्यांना त्यांची सत्ता अबाधित ठेवून केंद्रातील सत्तेवरही अंकूश ठेवण्याची संधी हवी आहे. त्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे भाजप व काँग्रेसला बाजूला ठेवून तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी आघाडी घेत होते. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक राज्यांत पुन्हा पाचव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या तयारीत असतानाच देशात तिसऱ्या आघाडीची सत्ता येईल असे भाकित वर्तवित आहेत. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत, उत्तर प्रदेशातील महागठबंधनच्या मदतीने केंद्रातील सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा बोलून दाखवित आहेत. 

ममता दीदी आघाडीवर 
पश्‍चिम बंगालमध्ये भाजपने कितीही दावा केला, तरीही ममता दीदींचा तृणमूल काँग्रेस 42 पैकी किमान तीस जागा जिंकेल, असा अंदाज आहे. गेल्या वेळी त्यांच्याकडे 34, काँग्रेसकडे चार, तर भाजप व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे प्रत्येकी दोन जागा होत्या. काँग्रेस व सीपीआय (एम) यांची गेल्या वेळी आघाडी होती. त्या दोन्ही पक्षांची ताकद कमी झाली आहे. त्यातील बहुतेक मते भाजपकडे वळाली आहेत. मात्र, भाजपच्या नेत्यांनी कितीही आटापिटा केली, तरी त्यांच्या जागा आठ-दहापेक्षा जास्त जाण्याची शक्‍यता कमी आहे. 

भाजपचे आव्हान 
ओरिसामध्ये बिजू जनता दलाचे (बीजेडी) मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 2014 मध्ये राज्यात सत्ता कायम ठेवतानाच लोकसभेच्या 21 पैकी 20 जागा मिळविल्या होत्या. ते 2000 पासून मुख्यमंत्री आहेत. तरीदेखील यावेळीही ते पाचव्यांदा विधानसभा जिंकतील, असे तेथील राजकीय वातावरण आहे. त्यांचे काही प्रमुख सहकारी भाजपमध्ये गेले आहेत. पंचायतीच्या निवडणुकीत भाजपने येथे मोठी मुसंडी मारली. त्यामुळे काँग्रेसची जागा भाजपने मिळविली आहे. पटनाईक यांनी लोकसभेच्या उमेदवारांत मोठे बदल केले. नवीन चेहरे देताना त्यांनी सात जागांवर महिलांना उमेदवारी दिली. म्हणजे 33 टक्के महिलांसाठी आरक्षण दिले. भाजप या राज्यांत चांगल्या म्हणजे निम्म्यापर्यंत जागा मिळविण्याची शक्‍यता आहे. पटनाईक मात्र हा दावा फेटाळून लावतात. केंद्रात दोन्ही राष्ट्रीय पक्षांपासून सारख्या अंतरावर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आंध्रात वायएसआर काँग्रेस प्रभावी 
आंध्रप्रदेशात तेलगू देशमने गेल्या वेळी भाजपच्या एनडीएसोबत आघाडी करून निवडणूक लढविली. त्यांना 15, भाजपला दोन, तर विरोधात असलेल्या वायएसआर काँग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या. तेलगू देशमने नंतर एनडीएतून बाहेर पडली. त्यांनी काँग्रेसच्या मदतीने तेलंगणात विधानसभा लढविली पण त्यांचा दणकून पराभव झाला. त्यामुळे आता ते स्वतंत्र लढत आहेत. वायएसआर काँग्रेसच्या खासदारांनीही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळत नसल्याचे कारणाने केंद्राचा निषेध करीत राजीनामे दिले. सध्या या राज्यात विधानसभेची निवडणूक झाली. दोन्ही प्रादेशिक पक्षांनी त्यावरच भर दिला. लोकसभेच्या 25 जागांपैकी बहुतेक जागा या दोन पक्षांतच विभागल्या जातील. राष्ट्रीय पक्षांना एखाददुसऱ्या जागेवर समाधान मानावे लागेल. वायएसआर काँग्रेस यावेळी राज्यात सत्तेवर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे खासदारही त्यांचेच जास्त येतील. हा पक्ष 2011 मध्ये काँग्रेसमधून फुटून बाहेर पडला होता. मात्र, काँग्रेसबद्दल काही राग नसल्याचे या पक्षाचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी नुकतेच सांगितले. सत्तेचे पुढील गणित लक्षात घेत भाजपच्या नेत्यांनीही या पक्षाशी संपर्क साधण्यास प्रारंभ केला आहे. 

टीआरएसचे वर्चस्व 
तेलंगणा राज्यात गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुन्हा एकहाती सत्ता मिळविली. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने 17 पैकी 11 जागा मिळविल्या होत्या. काँग्रेसने दोन, तर भाजप, तेलगू देशम, वायएसआर काँग्रेस आणि एमआयएमने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. यावेळी एमआयएम त्यांची जागा राखेल. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) गेल्या वेळेपेक्षाही जास्त जागा जिंकण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत टीआरएसने 119 पैकी 88 जागा जिंकल्या, तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने 19 आणि एमआयएमने सात जागा मिळविल्या. भाजप, तेलगू देशम यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. त्यामुळे, या निवडणुकीत काँग्रेसला मिळाली तर एखाददुसरी जागा मिळेल, अन्यथा टीआरएसचेच वर्चस्व राहील. 

तमिळनाडूत द्रमुक आघाडीवर 
तमिळनाडूत दोन्ही द्रमुक पक्षांनी यंदा राष्ट्रीय पक्षांसोबत, तसेच स्थानिक पक्षांसोबत आघाडी केली आहे. अण्णा द्रमुकने मुख्यमंत्री जयललिता यांच्या नेतृत्वाखाली 39 पैकी 37 जागा गेल्या वेळी जिंकल्या, तर उर्वरीत दोन जागा एनडीएने मिळविल्या. जयललिता आणि द्रमुकचे नेते करूणानिधी यांच्या निधनानंतर राज्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. द्रमुकने माजी उपमुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सत्तारुढ अण्णा द्रमुक यांना घेरण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. द्रमुक काँग्रेससोबत युपीए या आघाडीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. तर, भाजप व अण्णा द्रमुक एकत्र आहेत. स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील आघाडी यंदा जास्त जागा जिंकेल, असा अंदाज आहे. तमिळनाडूतील सर्वच जागा यंदा एनडीए किंवा युपीए या आघाडीमध्ये मोजल्या जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com