अंदाजपंचे: नाशिकमध्ये गोडसेंचा विजय तर नगर अन् शिर्डीमध्ये...

रविवार, 12 मे 2019

शिर्डीत कांबळेचा विजय होणार!
नगरमध्ये जगताप मारणार बाजी !
हेमंत गोडसेंचाच होणार विजय !

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

शिर्डीत कांबळेचा विजय होणार!
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन मातब्बर नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. खासदार सदाशिव लोखंडे (शिवसेना) आणि आमदार भाऊसाहेब कांबळे (कॉंग्रेस) यांच्यातच सामना रंगलाय. लोखंडेंना विखेंचे तर कांबळेंना थोरातांचे खंबीर पाठबळ आहे. त्यातच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही मतदारसंघात तिसरे आव्हान निर्माण केलंय. वाकचौरेंची बंडखोरी कांबळेंना फायदेशीर ठरणार, की दोघांच्या मतविभाजनात तेच बाजी मारणार, हे सांगणे कठीण असले तरी, राहुल गांधींची झालेली सभा आणि थोरातांनी लावलेला जोर लक्षात घेता शिर्डी लोकसभा मतदारसंघात कांबळेंचा विजय निश्चित मानला जात आहे.

नगरमध्ये जगताप मारणार बाजी !
नगर हा विखेंचा पारंपरिक मतदारसंघ नाही. त्यामुळे त्यांचे सगळे विरोधक एकत्र आले. पवारांनी त्यांना ताकद दिली आणि आमदार संग्राम जगताप यांनी विखे पाटलांना तगडे आव्हान दिलेले पाहायला मिळाले. मोदी सरकारच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असलेली नाराजी जगतापांच्या मदतीला आलेली दिसली. एकंदरित सर्व गोष्टी लक्षात घेता नगर लोकसभा मतदारसंघात आ. संग्राम जगताप हेच बाजी मारतील असे दिसत आहे.

नाशिकमध्ये चौरंगी लढतीने सामना अवघड तरीही हेमंत गोडसेंचाच होणार विजय 
राष्ट्रवादी कॉंग्रेसने समीर भुजबळ यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले तर शिवसेनेने खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली होती. सरळ वाटणारा सामना अचानक चौरंगी झाला. वंचित बहुजन आघाडीने पवन पवार तर भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूनक लढवली त्यामुळे पवार हे भुजबळांच्या मतावर तर कोकाटे हे गोडसेंच्या मतांवर डल्ला मारणार असल्याचे बोलले जात आहे म्हणूनच नाशिकमध्ये चौरंगी लढत झाली असून सामन्याचा निकाल सांगणे अवघड असले तरी शिवसेनेचे हेमंत गोडसेच बाजी मारणार हे निश्चीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hemant Godse, sangram jagtap and Bhausaheb Kamble likely to win Loksabha 2019