अंदाजपंचे: यवतमाळमध्ये बदल निश्चित; तर नागपूर, वर्ध्याचा असा असेल निकाल

मंगळवार, 21 मे 2019

नागपूरचा 'गड' गडकरीच राखणार
वर्ध्यात चुरशीची लढत; पण भाजप मारणार बाजी
यवतमाळात माणिकराव ठाकरेंचा विजय निश्चित
 

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

नागपूरचा 'गड' गडकरीच राखणार
नागपुरातील गल्ली, मोहल्ल्यापासून व्यक्तिगत नागरिकांपर्यंत सर्वांसोबत परिचित असलेले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि नागपूरकरांसाठीच नवा चेहरा असलेले माजी खासदार नाना पटोले यांच्यात थेट लढत नागपूर लोकसभा मतदारसंघात झालेली पाहायला मिळाली. ही निवडणुक अत्यंत चुरशीची झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता दिसून येत आहे. ही अस्वस्थता पराभवाची नसून गडकरींनी मागील निवडणूकीत घेतलेल्या मतांच्या टक्केवारीत घट होण्याबाबत आहे. कॉंग्रेस समर्थक जातीय समीकरणे मांडत असून त्याच समीकरणाच्या जोरावर नाना पटोले जिंकतील, असा विश्‍वास व्यक्त करीत आहेत. परंतु पटोले हे नागपूरकरांसाठी नवखे उमेदवार होते. तसे पाहता गडकरी हे नागपूरकरांसाठी पूर्ण परिचित असे उमेदवार होते. तसेच राष्ट्रीय नेतृत्व आणि त्यांनी केलेल्या विकासकामांचा अहवाल पाहता गडकरींचा विजय निश्चित मानला जात आहे. 

वर्ध्यात चुरशीची लढत; पण भाजप मारणार बाजी
वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यात काट्याची टक्कर झाली. पण भाजपचे रामदास तडस कमी मतांच्या फरकाने विजयी होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. वर्धा मतदारसंघात बसप, बहुजन वंचित आघाडीचाही उमेदवार होता; मात्र हे दोन्ही उमेदवार मतदारांवर फारसा प्रभाव पाडू शकले नाही त्यामुळे या दोन पक्षांना मिळणारे मतदान मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या पारड्यात गेले, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. विदर्भातील काही मतदारसंघासह वर्धा मतदारसंघातही कुणबी दलित आणि मुस्लिम या तीन समाजातील मतदान हे मोठ्या प्रमाणात काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. या आधारावर भाजपला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांनी काँग्रेसचे सागर मेघे यांच्यावर दोन लाख 17 हजार मतांनी विजय मिळविला होता, याच आधारावर भाजपची लिड कमी होईल पण भाजपचाच उमेदवार विजयी होईल असे आडाखे सध्या मतदारसंघात बांधले जात आहेत. ग्रामीण भागातील वातावरण हे विद्यमान सरकारच्या विरोधातील आहे. शेतमालाला भाव, कर्जमाफी या प्रश्नांमुळे काँग्रेसला त्याचा फायदा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी, निसटत्या मताधिक्याने का होईना, भाजपचाच विजय होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

यवतमाळात माणिकराव ठाकरेंचा विजय निश्चित
यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे विजयी होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. तर, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना प्रथम पराभवाचा सामना करावा लागेल, असे सांगण्यात येत आहे. गेल्या चार लोकसभेत खासदार गवळी यांनी दोन वेळा वाशीम व दोन वेळा यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या काळात मतदारसंघाचा अपेक्षित विकास झाला नाही. त्यामुळे मोदी लाटेचाही यावेळी त्यांना फायदा होणार नाही. तर, प्रथम त्यांना मराठा-कुणबी उमेदवारासोबत लढावे लागले. तसेच स्व:पक्षातून प्रचंड विरोध झाला. सोबत असणार्‍यांनीच दगा दिला. अपक्ष उमेदवार पी. बी. आडे व वंचित बहुजन समाज पक्षाचे उमेदवार प्रवीण पवार यांची कामगिरी सुमार राहिल्याने त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. पुसद, वाशीम व कारंजा व राळेगाव या चार विधानसभा मतदारसंघांनी काँग्रेसला यावेळी तारल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार लोकसभेत जातील, असा कयास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 result prediction in Nagpur Wardha and Yawatmal Losksabha constituency