अंदाजपंचे: रावेरला पुन्हा रक्षा खडसेच, तर जळगांव बुलढाण्याचा असा असेल निकाल

शुक्रवार, 17 मे 2019

​रावेरला खडसेंचाच बोलबाला !
जळगावातून देवकरांना संधी !

बुलडाण्यात राष्ट्रवादीच्या शिंगणेंना संधी​

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

रावेरला खडसेंचाच बोलबाला
जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी राज्यातील तिसऱ्या टप्प्यात अर्थात, 23 एप्रिलला मतदान झाले. रावेरची लढत एकतर्फी वाटत असली तरी त्याठिकाणी एकनाथ खडसेंच्या स्नुषा व विद्यमान खासदार रक्षा खडसेच निवडून येतील, असे मानले जात आहे. लोकसभेच्या प्रमुख लढतीत रावेरच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष होते. एकनाथ खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसेंच्या विरोधात ऐनवेळी कॉंग्रेसकडे मतदारसंघ गेल्यानंतर माजी खासदार डॉ. उल्हास पाटलांनी आव्हान उभे केले. मतदानानंतर मात्र, रक्षा खडसेंच्या विजयाचा दावा प्रबळ मानला जात आहे.

जळगावातून देवकरांना संधी !
जळगाव मतदारसंघ अनेक वर्षांपासून भाजपकडे असले तरी अंतर्गत गटबाजीचा परिणाम यावेळी जळगावात भाजपच्या कामगिरीवर होणार असल्याचे दिसून येते. विद्यमान खासदार ए.टी. पाटलांचे तिकिट कापल्यानंतर जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी विधान परिषद सदस्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, ऐनवेळी त्यांना माघार घ्यायला लावल्यानंतर चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील उमेदवार झाले. अंतर्गत गटबाजीने अमळनेरच्या मेळाव्यात मंत्री गिरीश महाजनांदेखत हाणामारी झाली. या बाबींचा परिणाम भाजपच्या कामगिरीवर होणार असून त्यामुळे देवकरांना अधिक संधी आहे, असे सांगितले जाते. या मतदारसंघात देवकरांचा विजय निश्चित मानला जात आहे.

बुलडाण्यात राष्ट्रवादीच्या शिंगणेंना संधी
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे व वंचित आघाडीचे बळीराम सिरस्कार यांच्यात लढत झाली. संपूर्ण निवडणूक जातीय समीकरणे, खासदारांची विरोधातील अॅन्टी इनकम्बन्सी व मुस्लिम समाजातील मतदान कुठे जाते याच मुद्यांवर झाली. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधातील लाट व डाॅ. शिंगणे यांच्या प्रति असलेले गुडविल यामुळे शिंगणे यांना निवडणूक सोपी गेली. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरही ताकदीनिशी डाॅ. शिंगणे यांच्या पाठीशी होते. काॅग्रेसने देखिल यावेळी प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचे काम केले. या सर्व डाॅ. शिंगणे यांच्या जमेच्या बाजू असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 result prediction in Raver, Jalgaon and Buldhana Losksabha constituency