Loksabha 2019 : मोदींकडून पवारच टार्गेट का? 

उमेश शेळके
सोमवार, 8 एप्रिल 2019

भाजपच्या काही नेत्यांनी यापूर्वी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या 'परदेशी महिला' म्हणून हल्ला चढविला होता. त्यानंतर राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून जाहीरपणे आणि सोशल मिडीयातून हिनविण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांच्या पाठीराख्यांकडून करण्यात आला. त्यानंतर आता 'टार्गेट पवार' हा कार्यक्रम पक्षाकडून हाती घेण्यात आला असल्याचे चित्र सध्या तरी दिसते आहे.

लोकसभा 2019
देशातील पंतप्रधानपदासारखे सर्वोच्च पद भूषविणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबीयांना लक्ष्य का केले. सर्वोच्च पदावरील व्यक्तीने या पातळीवर उतरून टीका करणे उचित आहे का, यामागील कारणे काय आहेत, असा प्रश्‍न अनेकांना या निमित्ताने पडला आहे. आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकांमध्ये देशाच्या आजी- माजी पंतप्रधानांच्या सभा झाल्या. अगदी इंदिरा गांधी पासून, ते अगदी अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा अनेकांनी भाषणे लोकांनी ऐकली. पण त्यांनी पदाची प्रतिष्ठा सांभाळली. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारर्किर्दीत काय काम केले, पुढील पाच वर्षात काय काम करणार याचा लेखाजोखा देशासमोर मांडला. पंतप्रधानांकडून हीच अपेक्षा लोकांची देखील असते. मात्र मोदी यांच्यासह या सरकारमधील सर्वोच्च नेत्यांनी हा विषय जणू आपला नाहीच असे ठरविले असून केवळ या ना त्या कारणाने विरोधकांवर ह्लल्ला चढविण्याचा एक कलमी कार्यकम हाती घेतला असल्याचे दिसते. 

भाजपच्या काही नेत्यांनी यापूर्वी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या 'परदेशी महिला' म्हणून हल्ला चढविला होता. त्यानंतर राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून जाहीरपणे आणि सोशल मिडीयातून हिनविण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांच्या पाठीराख्यांकडून करण्यात आला. त्यानंतर आता 'टार्गेट पवार' हा कार्यक्रम पक्षाकडून हाती घेण्यात आला असल्याचे चित्र सध्या तरी दिसते आहे. सरकारच्या कारभारावर आणि धोरणांवर चर्चा करण्यासारखे (नोटाबंदी, जीएसटी सारखे विषय) काही नसते किंवा तशी चर्चा झाली, तर आपल्या अंगलट येऊ शकते. यांची जाणीव झाली भाजपला झाली असावी. त्यामुळेच लोकांचे लक्ष त्यावरून वळविण्यासाठी विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना टार्गेट करणे सोपा मार्ग त्यांना वाटत असावा. त्यामुळे त्यांनी पवार यांना टार्गेट केले असावे, वाटणे सहाजिक आहे. दुदैवाने माध्यमे आणि समाजातून देखील अशा चिखलफेकीचा प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. 

राज्यात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांवर हल्ला करावयाचा तर तो कोणावर करावा, हा देखील एक प्रश्‍न आहे. कारण शरद पवार यांच्या उंचीचा नेता सध्या तरी काँग्रेसकडे नाही. पवार यांच्यावर हल्ला करून महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक नेते आजपर्यंत मोठे झाले. त्यामुळे पवार यांच्यावर टीका केली की एक वर्ग सुखावतो. असे लक्षात आल्याने त्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी 'पवार टार्गेट' केले जात असावे, असे एक कारण त्यामागे मानले जात आहे. 1995 मध्ये अशा प्रकारे पवार यांना टार्गेट करून राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली होती. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांचे राजकीय नात्यावर आतापर्यंत अनेकदा चर्चा झडली. गेल्या निवडणुकीनंतर मोदी हे बारामती येथे आले होते. त्यावेळी 'पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो,' असे वक्तव्य त्यांनी केले होते. मोदी यांचे हे वक्तव्य प्रचंड गाजले होते. त्यावरून मोदी आणि पवार या दोन्ही नेत्यांना टीकेला तोंड द्यावे लागले होते. या कथित दोस्तीचा प्रचाराला उत्तर देण्यासाठी मोदी पवार यांच्यावर या पातळीवर येऊन टीका करीत असतील, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. 

गेल्या काही काळात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार नसतानाही उतरले आहेत. त्यांनी मोदी आणि अमित शहा यांच्यावर तिखट शब्दावर हल्ला चढविण्यास सुरवात केली आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍न मतदारांना विचार करायला लावणारे आहेत. त्यांच्या सभांना 'टीआरपी' देखील मोठा आहे. ठाकरे यांना पवार याचाच आर्शिवाद असल्याचा संभ्रम भाजपमध्ये आहे. त्यामुळे हा देखील एक राग मनात धरून मोदी पवार यांच्यावर टीका करीत असावेत, असे सांगितले जात आहे. यापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना उद्देशन 'बारामतीचा पोपट' अशी टीका देखील केली होती. 

राज्यात अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले अनेक उमेदवार हे स्ट्राँग आहेत. हे देखील एक कारण असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे उत्तर कदाचित निवडणुकीनंतर कळले देखील, परंतु आज तरी 'मोदी पवारांना टार्गेट का करीत आहेत,' हा प्रश्‍न कायम आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umesh Shelke writes about why Narendra Modi targets Sharad Pawar