Election Results : पाच वर्षं घाम गाळला; आता भाजपच्या पवारांना विजयश्री

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 23 मे 2019

दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार दीड लाखांच्या मताधिक्‍यांनी विजयी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महाले यांचा पराभव झाला. हा निकाल म्हणजे  २०१४  मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. पवार यांनी हा विजय खेचुन आणला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीत अनास्था दाखविली. धनराज महालेंना एकटेच सोडून दिल्याचे जे चित्र होते. त्याची परिणीती राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनुकुलता असूनही पराभवात झाली आहे.

दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार दीड लाखांच्या मताधिक्‍यांनी विजयी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महाले यांचा पराभव झाला. हा निकाल म्हणजे  २०१४  मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. पवार यांनी हा विजय खेचुन आणला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीत अनास्था दाखविली. धनराज महालेंना एकटेच सोडून दिल्याचे जे चित्र होते. त्याची परिणीती राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनुकुलता असूनही पराभवात झाली आहे.

भाजपच्या डॉ. पवार या मुळच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या. २०१४ मध्ये भाजपचे हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्याकडून त्या अडीच लाखांनी पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सातत्याने लोकसंपर्क सुर ठेवला. सलग पाच वर्षे कार्यकर्ते, नेते अन्‌ लोकांमध्ये त्या वावरत होत्या. त्यामुळे यंदा त्यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात होती. मात्र, या कालावधीत त्यांच्या कुटुंबातींल भाऊबंदकी विकोपाला गेली. त्यावर तोडगा काढण्याऐवजी स्थानिक नेतृत्वाने माजी आमदार धनराज महाले यांना शिवसेनेतुन आयात केले. त्यातुन उमेदवारीच्या कोंडीतुन नेत्यांची सुटका करुन घेतली. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच बहुतांशी गावपातळीवर नेत्यांना पसंत पडले नाही. हे सर्व लोक डॉ. पवार यांच्याविषयी सहानुभूती ठेऊन प्रचारात त्यांच्याबरोबर गेले. हे दिसत असतांना कोणीही त्यांना रोखण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत.

भाजपने तीन टर्म खासदार राहिलेल्या चव्हाण यांची उमेदवारी रद्द केल्याने मतदारसंघात नाराजी होती. त्याचा फायदा घेता आला नाही. मुख्य म्हणजे जेव्हा निवडणुकीत यंत्रणा पक्की करण्याची वेळ होती तेव्हा धनराज महाले एकटेच विस्कळीतपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे उंबरे झीजवत होते. कोणीही नेता त्यांच्याबरोबर नव्हता. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा महाले यांना उमेदवारी देण्यात मोठा सहभाग होता. मात्र, त्यानंतर त्यांनी केवळ दोन दिवस प्रचार केला. मात्र त्यांचे शिलेदार गांभीर्याने प्रचारात नव्हते असे बोलले जाते. 

मतदारसंघात कॉंग्रेस पक्ष क्षीण आहे. मात्र, नांदगावमध्ये आमदार पंकज भुजबळ व कॉंग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांच्यात शीतयुध्द झाले. स्वतः भुजबळ नाशिकच्या प्रचारात व कॉंग्रेसचे आहेर जाहीरपणे मतभेद व्यक्त करीत होते. गंमत म्हणजे नांदगाव, येवला हे दोन्ही मतदारसंघ भुजबळांचे. मात्र तेथे भाजपला गेल्या तीन निवडणूकांत आघाडी मिळत आली आहे. यंदा त्यात वाढ झाली. मात्र त्याची फारशी चर्चा झाली नाही. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. 

यंदाच्या निवडणुकीत डॉ. पवार आणि भाजपची यंत्रणा यामध्ये प्रारंभी समन्वय नव्हता. मात्र त्यावर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि प्रचारप्रमुख आमदार डॉ. राहूल आहेर यांनी परिश्रम घेत मात केली. 1881 बुथवर वर्षभर प्रयत्न करुन त्यांनी शक्तीप्रमुखांची मोठी फौज कार्यरत केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे झालेली सभा व त्यासाठी जमविलेली गर्दी उपयोगी व यशस्वी ठरली असे म्हणता येईल. त्यात गिरीश महाजन यांचे 'कॅलक्‍युलेशन' अंतिम विजयाद्वारे यशस्वी झाले. 

या मतदारसंघात आदिवासी व शेतकऱ्यांसाठी लॉग मार्च काढणारे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे. पी. गावीत यांना अवघे लाखभर मते मिळाली. त्यांचा बेस कायम आहे हे त्यातुन सिध्द झाले. मात्र महाराष्ट्राचे हक्काचे गुजरातला जाणारे पाणी, कांदा व शेतमालाचे पडलेले भाव, दुष्काळ, शेतकऱ्यांची आंदोलने, रखडलेली विकासकामे हे अतिशय गंभीर प्रश्‍न होते. मात्र, नेमक्‍या त्याच भागात भाजपला आघाडी मिळालेली दिसते. याचा अर्थ लोकांना ते महत्वाचे वाटत नसावे किवा हे मुद्दे वापरुन घेण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अपयशी ठरली. येत्या पाच वर्षात जनतेला त्याचे परिणाम व परिमाण दोन्ही स्पष्ट करणारी ही निवडणूक ठरली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election result analysis of Dindori Loksabha Constituency