Loksabha 2019 : हुकूमशाही हवी की लोकशाही : राज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 एप्रिल 2019

ठाकरे यांचा हल्लाबोल
- राज्यात १४ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या
- सत्तेच्या माजातून शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य
- नोटाबंदी, जीएसटीमुळे साडेचार कोटी नोकऱ्या गेल्या
- एचएएलकडे काम नाही, राफेल विमानांचे काम अंबानींना

नाशिक -‘‘नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही विकासकाम केले नाही. याउलट मनसेच्या सत्ताकाळात झालेली कामे स्मार्ट सिटी प्रकल्पात दाखवून खोटारडेपणा दाखविला. नाशिकची वाताहत होत असताना कुठे गेला नाशिककरांचा दत्तक बाप?’’ असा थेट सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक सर्जिकल स्ट्राइक केला. हुकूमशाही की लोकशाही हे ठरविणारी निवडणूक असल्याने मोदी-शहांना राजकारणातून हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या वेळी ठाकरे केंद्र व राज्य सरकारवर तुटून पडले. या वेळी मनसेच्या सत्ताकाळात झालेली कामे व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दाखविली. कांद्याला भाव देण्याचे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते; परंतु शेतकऱ्याला एक, दोन रुपये भाव देऊन चेष्टा केली. शेतकरी उद्‌ध्वस्त करण्याचे काम मोदींनी केले. राज्यात एक लाख २० हजार विहिरी बांधल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत. जर विहिरी बांधल्या तर २९ हजार गावे दुष्काळग्रस्त का घोषित  करावी लागली? सिंचनाचा पैसा गेला कुठे, असा प्रश्‍न ठाकरे यांनी केला. 

इगतपुरी या धरणांच्या जिल्ह्यातील बोर्डीची वाडी या गावाची साम टीव्हीवरील चित्रफीत ठाकरे यांनी दाखवून दुष्काळाचे भीषण वास्तव लोकांसमोर मांडले. निवडणुकीच्या तोंडावर लोकांना वेड्यात काढण्याचे काम सरकार करते आहे. २०१४ च्या निवडणुकीत पाटबंधारे विभागात ७० हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा करताना सत्ता आल्यास सुनील तटकरे, अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याचा दावा केला होता. आता सरकार येऊन साडेचार वर्षे झाली, काय कारवाई केली? छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकले पुढे काय? असे विचारून सर्व गोष्टी दिखावू असल्याचा आरोप केला. 

सरकारकडून गळचेपी
रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या स्वाक्षरीच्या दोन हजार रुपयांच्या परदेशात छापलेल्या नोटा भारतात आणून ३ लाख रुपयांच्या जुन्या नोटा प्रायव्हेट संस्थांना बदलून देण्यात आल्या. त्यासाठी सरकारी संस्थांचा वापर करण्यात आल्याचा माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या पत्रकार परिषदेतील आरोप कुठेच छापून न आल्याने सरकार माध्यमांची गळचेपी करत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. 

ठाकरे यांचा हल्लाबोल
- राज्यात १४ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या
- सत्तेच्या माजातून शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य
- नोटाबंदी, जीएसटीमुळे साडेचार कोटी नोकऱ्या गेल्या
- एचएएलकडे काम नाही, राफेल विमानांचे काम अंबानींना
- २०१६ या वर्षात देशात ३९ हजार बलात्काराच्या घटना
- गोहत्येच्या नावाखाली दलितांवर हल्ले
- मोदींची पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे नाहीत, मात्र अक्षय कुमारला मुलाखत
- प्रज्ञा ठाकूरला उमेदवारी देऊन पोलिसांचा अपमान
- विरोधात बोलणाऱ्यांना ईडीची भीती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS president Raj Thackeray held a public meeting at Martyr Anant Kanhere Ground