Loksabha 2019: मॉडेल निकिता गोखले म्हणते "अच्छे दिन' फोल

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 19 April 2019

जिल्ह्यातील तुमसर येथील मूळ निवासी असलेल्या निकिता गोखले या आंतरराष्ट्रीय मॉडेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र पाठवून लहान गावातील नागरिकांना शासकीय व्यवस्थेच्या अनास्थेमुळे होत असलेला त्रास व समस्येला वाचा फोडली आहे. सध्या तिचे हे पत्र फेसबुकवर चर्चेचे ठरले आहे. 

भंडारा: जिल्ह्यातील तुमसर येथील मूळ निवासी असलेल्या निकिता गोखले या आंतरराष्ट्रीय मॉडेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र पाठवून लहान गावातील नागरिकांना शासकीय व्यवस्थेच्या अनास्थेमुळे होत असलेला त्रास व समस्येला वाचा फोडली आहे. सध्या तिचे हे पत्र फेसबुकवर चर्चेचे ठरले आहे. 

निकिता ही तुमसरवासी असून तिचे खरे नाव दुर्गा शिवप्रसाद गोखले आहे. राष्ट्रीय स्तरावर सध्या एक यशस्वी मॉडेल आणि आर्थिक सल्लागार म्हणून ती प्रसिद्ध आहे.  निकिताचे प्राथमिक व माध्यमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण तुमसरात झाले. अल्पावधीत तिने मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावले आहे. ती सध्या युरोपात वास्तव्यास असून दोन महिन्यांसाठी सुट्या घालविण्यासाठी तुमसरमध्ये आली आहे. या काळात आलेले आलेले कटू अनुभव तिने थेट या पत्रातून मांडले आहेत. 

14 एप्रिलला फेसबुकवर पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ती लिहिते की, गेले पाच वर्षांत तिने जगभर प्रवास केला. या प्रवासादरम्यान भारतीय व परदेशी मित्रांशी बोलताना त्या सर्वांनीच पंतप्रधान मोदींबाबात चांगल्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. परंतु, त्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. पुढे ती लिहिते, नागरी सेवांसाठी येथे लाच मागितली जाते. मोदीजी प्रचारात व्यस्त होता, पण मी तुमसर पालिकेत नळ कनेक्‍शन घेण्यासाठी 15 मार्चपासून हेलपाटे घालण्यात व्यस्त होते. तरीही कनेक्‍शन मिळाले नाही.

"स्वच्छ भारत'चा गवगवा आहे. पण, इथे तुमसरात कचरा उचलणारे आठवड्यातून एकदाच तोंड दाखवतात. समोरचा नागरिक तर भिकारी आहे, अशा आविर्भावात अधिकारी-कर्मचारी वागतात. निवडणुकीच्या वेळी स्थानिक राजकारणी भिकाऱ्याप्रमाणे याचना करतात. पण निवडणूक संपली की त्यांचे वागणे राजाप्रमाणे असते. पेड मॉडल्स आणि मार्केटिंग करून सोशल मीडियावर सारे काही चांगले असल्याचा भास निर्माण केला गेला आहे. पण तो फोल आहे, हाच माझा येथील दोन महिन्यांच्या वास्तव्याचा अनुभव आहे. याबाबतीत गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजनांची गरज आहे, असे निकिताने आपल्या पत्राच्या शेवटी नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acche Din Fail Model Nikita Gokhale Write letter for Narendra Modi