Loksabha 2019 : निकालाबाबत उत्सुकता अन्‌ अस्वस्थताही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध चॅनलवर ‘एक्‍झीट पोल’ची निरीक्षणे बाहेर आली असून विदर्भात भाजपला चार तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

नागपूर - अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध चॅनलवर ‘एक्‍झीट पोल’ची निरीक्षणे बाहेर आली असून विदर्भात भाजपला चार तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. शहरातही या अंदाजावर खमंग चर्चा रंगली असून  शर्यतीला ऊत आला आहे. त्यामुळे शहरातील भाजप, काँग्रेस समर्थकांत आता निकालाबाबत उत्सुकता वाढली असून काही जणांत अंदाजांवरून अस्वस्थताही वाढल्याचे चित्र आहे. 

नागपुरात मतदान होऊन सव्वा महिन्याचा काळ लोटला असून दिवसागणिक नागपूरकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप समर्थक केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या मोठ्या फरकाने विजयाचे दावे करीत आहेत. मात्र, गेल्या सव्वा महिन्यात मतदानाच्या दिवशी नेमके काय झाले? कुणी कुणाचे काम केले? विविध समाज कुणाकडे गेला? यावरून चांगलीच चर्चा कट्ट्यांवर, पानटपरीवर चांगलीच रंगली. काहींनी विदर्भात कुणाला किती जागा मिळेल, याचेही अंदाज त्या-त्या ठिकाणची माहिती घेऊन व्यक्त केले. या चर्चांमध्ये भाजपला विदर्भात मागील निवडणुकीच्या तुलनेत धक्का बसण्याची शक्‍यता नागरिकांनी व्यक्त केली. आज काही एक्‍झिट पोलचे अंदाज पुढे आले. त्यातून नागरिकांच्या अंदाजांवर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र आहे. नागपुरात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात थेट लढत आहे. गडकरी यांनी कधीही जाती धर्माचे राजकारण केले नाही. त्यांनी विकासाची गंगा प्रत्येक नागरिक, समाज, धर्मापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या पराभवाचा प्रश्‍नच येत नाही, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहे. दुसरीकडे काँग्रेस समर्थक नाना पटोले नवीन असले तरी मागील निवडणुकीप्रमाणे यावेळी मोदी लाटेऐवजी नाराजी असल्याचा दावा करीत आहे. त्याचा फायदा काँग्रेसला मिळणार असून पटोले गडकरींना धक्का

 देतील, असा युक्तिवाद काँग्रेस समर्थक करीत आहे. दोन्ही उमेदवारांचे समर्थक विजयाचे दावे करीत असले तरी अस्वस्थताही दिसून येत आहे. काँग्रेसला गमावण्यासारखे काहीच नाही, मात्र, भाजपचे काही समर्थकांत गडकरी यांचे विजयाचे अंतर कमी झाले तर? या प्रश्‍नाने अस्वस्थ दिसत आहेत. आता एक्‍झिट पोलमध्ये विदर्भात धक्‍क्‍यांचा अंदाज व्यक्त केल्याने त्यांच्या अस्वस्थतेत आणखी भर पडली आहे. दुसरीकडे शहरातील व्यावसायिकांनी आपापल्या आवडत्या उमेदवारांच्या विजयाची खात्री व्यक्त करीत शर्यती लावण्यास सुरुवात केली आहे. इतवारी, महाल, सीताबर्डी, सदर या मोठ्या बाजारातील व्यावसायिक फोनवरूनच शर्यत लावताना दिसून येत आहे. 

गडकरी ४ लाख ७३ हजार मतांनी जिंकणार 
शहरातील युवा भारती, नागपूर या संस्थेने स्पायपोल ॲनालिटिकाच्या सहकार्याने केलेल्या  ‘एक्‍झीट पोल’मध्ये भाजप उमेदवार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी ६७.४ टक्के मते घेऊन विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला. ११ एप्रिल रोजी ११ लाख ८२ हजार ५०७ मतदारांनी मतदान केले. यातील ६७.४ टक्के अर्थात ७ लाख ९७ हजार ९ मते गडकरींना तर २७.४ टक्के अर्थात ३ लाख २४ हजार ६ मते काँग्रेसचे नाना पटोले यांना मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हा अंदाज खरा निघाल्यास गडकरी ४ लाख ७३ हजार मतांनी विजयी होतील.

विजयाच्या अंतरावरून ‘बेटिंग’ 
विदर्भातील उमेदवारांचे विजयी मतांच्या अंतरावरूनही शर्यत लावण्यात येत आहे. केंद्रीयमंत्री तीन लाख मतांनी निवडून येतील, यावर मोठ्या प्रमाणात शर्यत लागली आहे. भंडाऱ्यात भाजपचे सुनील मेंढे एक लाख मतांनी निवडून येतील, यावरही शर्यती लागत आहे. एवढेच नव्हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष किती मतांनी निवडून येतील, यावरही ‘बेटिंग’ लावणारे सक्रिय झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curiosity and discomfort about the loksabha election result