Loksabha 2019 : विदर्भातील सात मतदारसंघांत आज मतदान : गडकरी, अहीर, ठाकरे यांच्यासह 116 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे हेविवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहीर व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचे भवितव्य अवलंबून आहे. गेले दहा दिवस प्रचाराचा धुराळा उडविल्यानंतर मंगळवारी जाहीर प्रचार संपला. 

त्यानंतर राजकीय पक्षांचा गुप्त बैठकांवर जोर होता. मात्र, आता परीक्षेचा दिवस उजाडला आहे. विदर्भातील सात मतदारसंघांपैकी सर्वाधिक उमेदवार नागपूर मतदारसंघातून तर गडचिरोलीतून सर्वांत कमी उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा या तीन लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात दि. 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. विदर्भातील उमरखेड विधानसभा क्षेत्राचा समावेश हिंगोली लोकसभा मतदारसंघात आहे. तेथेही दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व मोर्शी हे विधानसभा क्षेत्र वर्धा लोकसभा मतदारसंघात असल्याने या ठिकाणी उद्याच मतदान होणार आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येथे भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसकडून नाना पटोले यांच्यात मुख्य लढत आहे. चंद्रपुरात केंद्रीय मंत्री हंसराज अहीर (भाजप) व बाळू धानोरकर (काँग्रेस) यांच्यात, तर यवतमाळ-वाशीममध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची विद्यमान खासदार भावना गवळी यांच्याशी लढत होणार आहे. वर्धा येथे रामदास तडस (भाजप) विरुद्ध चारुलता टोकस (काँग्रेस), भंडारा-गोंदियात सुनील मेंढे (भाजप) वि. नाना पंचबुद्धे (राकॉं) व चिमूर-गडचिरोलीत अशोक नेते (भाजप) वि. डॉ. नामदेव उसेंडी (कॉंग्रेस) अशा मुख्य लढती आहेत. 

नागपूर लोकसभा मतदारसंघ 

एकूण उमेदवार : 30 
प्रमुख उमेदवार : नितीन गडकरी (भाजप), नाना पटोले (कॉंग्रेस), मोहम्मद जमाल (बसप) 
एकूण मतदार : 21 लाख 60 हजार 232 
मतदान केंद्रे : 2065 
संवेदनशील मतदान केंद्रे : 40 

रामटेक लोकसभा मतदारसंघ 

एकूण उमेदवार : 16 
प्रमुख उमेदवार : कृपाल तुमाने (शिवसेना), किशोर गजभिये (कॉंग्रेस), किरण पाटणकर (बसप) 
एकूण मतदार : 19 लाख 21 हजार 047 
मतदान केंद्रे : 2370 
संवेदनशील मतदान केंद्रे : 30 

वर्धा लोकसभा मतदारसंघ 

एकूण उमेदवार : 14 
प्रमुख उमेदवार : रामदास तडस (भाजप), चारुलता टोकस (कॉंग्रेस), शैलेश अग्रवाल (बसप), धनराज तेलंग (बहुजन वंचित आघाडी), ज्ञानेश वाकुडकर (लोकजागर पार्टी) 
एकूण मतदार : 17 लाख 43 हजार 206 
मतदान केंद्रे : 2026 
संवेदनशील मतदान केंद्रे : 0 

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ 

एकूण उमेदवार : 14 
प्रमुख उमेदवार : सुनील मेंढे (भाजप), नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), विजया नांदुरकर-ठाकरे (बसप), राजेंद्र पटले (अपक्ष) 
एकूण मतदार : 20 लाख 73 हजार 132 
मतदान केंद्रे : 2494 
संवेदनशील मतदान केंद्रे : 12 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ 

एकूण उमेदवार : 13 
प्रमुख उमेदवार : हंसराज अहीर (भाजप), बाळू धानोरकर (कॉंग्रेस), ऍड. राजेंद्र महाडोळे (वंचित बहुजन आघाडी) 
एकूण मतदार : 18 लाख 89 हजार 888 
मतदान केंद्रे : 2193 
संवेदनशील मतदान केंद्रे : 52 

चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघ 

एकूण उमेदवार : 5 
प्रमुख उमेदवार : अशोक नेते (भाजप), डॉ. नामदेव उसेंडी (कॉंग्रेस), डॉ. रमेशकुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी) 
एकूण मतदार : 7 लाख 69 हजार 746 
मतदान केंद्रे : 930 
संवेदनशील मतदान केंद्रे : 148 

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ 

एकूण उमेदवार : 24 
प्रमुख उमेदवार : भावना गवळी (शिवसेना), माणिकराव ठाकरे (कॉंग्रेस), परशराम आडे (अपक्ष), वैशाली येडे (प्रहार) 
मतदार संख्या : 19 लाख 14 हजार 745 (यवतमाळ-वाशीम लोकसभा) 
मतदान केंद्रे : 2,181 
संवेदनशील मतदान केंद्रे : 86 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first phase Polling in seven constituencies in Vidarbha