Loksabha 2019 : नेते-उसेंडी यांच्यातच लढत

सुरेश नगराळे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

खासदारपदाच्या काळात अशोक नेते यांनी मतदारसंघात सर्वव्यापी न केलेले काम आणि मतदारांशी संपर्कात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांची पिछाडी, उमेदवारांची भाऊगर्दी असे मतदारसंघाचे चित्र असले तरी लढत सरळ अशी आजची स्थिती आहे. मतविभाजन कसे होणार, यावर विजयाचे गणित जुळणार आहे.

खासदारपदाच्या काळात अशोक नेते यांनी मतदारसंघात सर्वव्यापी न केलेले काम आणि मतदारांशी संपर्कात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांची पिछाडी, उमेदवारांची भाऊगर्दी असे मतदारसंघाचे चित्र असले तरी लढत सरळ अशी आजची स्थिती आहे. मतविभाजन कसे होणार, यावर विजयाचे गणित जुळणार आहे.

राज्यात विस्ताराने मोठ्या चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजप आणि काँग्रेस दोघांसाठी फारशी सोपी नाही. एकीकडे भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्याबद्दल नाराजी, दुसरीकडे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी डॉ. नामदेव उसेंडी यांना अडचणीची ठरणार आहे. तरीही दोघांतच थेट लढत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार किती मते घेतात, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

मतदारसंघातून अशोक नेते, डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. रमेशकुमार गजबे यांच्यासोबत ‘बसप’चे हरिश्‍चंद्र मंगाम व आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव नन्नावरे, असे पाच उमेदवार रिंगणात आहेत. 

यंदाची निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर गाजण्याची चिन्हे आहेत. प्रचाराला रंगत चढत आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच नेते यांनी मतदारसंघात मतदारांशी संपर्क साधला होता. त्यांनी आघाडी घेतली. परंतु, डॉ. उसेंडी त्यात प्रारंभीच मागे राहिल्याने त्यांची प्रचारात दमछाक होतेय. आरमोरी विधानसभा क्षेत्रात माना समाज मोठ्या संख्येने आहे, त्याचा फायदा बहुजन वंचित आघाडीचे गजबे यांना होणार आहे. त्याचा भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम शक्‍य आहे.

जनतेत नेते यांच्याबद्दल नाराजी असल्याने त्यांना उमेदवारी देऊ नये, असे लेखी पत्र भाजपच्या पाच आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे दिले होते. त्यामुळे नाराज आमदार पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून कितपत मनाने प्रचारात सहभागी होतील, याबाबत शंकाच आहे. ही पक्षांतर्गत गटबाजी नेतेंसाठी अडचणीची ठरू शकते. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधानंतरही पक्षक्षेष्ठींनी डॉ. उसेंडींनाच मैदानात उतरवले. त्यामुळे वडेट्टीवारांचा गट नाराज आहेच. 

नेतेंमागे कार्यकर्त्यांची फळी
भाजपची बूथ रचना, तसेच गावागावांत कार्यकर्त्यांची फळी आहे. यासोबतच संघाचे कार्यकर्ते निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरल्याने नेते यांना प्रचारासाठी मोठी मदत होत आहे. साम, दाम, दंड हेही पाठीशी आहे, ही भाजपची जमेची बाजू आहे. मात्र, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांशी गेल्या पाच वर्षांत त्यांनी संवाद साधला नाही. यामुळे त्यांची नाराजी अडचणीची ठरू शकते.

नेतेंवर नाराजांवर उसेंडींची भिस्त
मतदारसंघात मागील पाच वर्षांत एकही मोठे काम झाले नाही. त्यामुळे खासदार नेतेंबाबत नाराजी असणाऱ्यांची डॉ. उसेंडी यांच्याबद्दल सहानुभूती दिसून येते. प्रचारातील स्थानिक मुद्दे, धनगर आरक्षण, वन कायद्याबद्दल आदिवासींमधील नाराजी या उसेंडींच्या जमेची बाजू आहेत. त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Gadchiroli Chimur Constituency Politics