Loksabha 2019 : जातीय समीकरणांचे प्राबल्य 

शैलेश पांडे 
गुरुवार, 14 मार्च 2019

नागपूर - दोन विद्यमान केंद्रीय मंत्री, दोन माजी केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक दिग्गजांच्या लढती नागपूर विभागातील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये रंगणार आहेत. "अँटी-इन्कम्बन्सी'चा मुद्दा आणि निवडून येण्याच्या क्षमतेबरोबरच त्यासाठी आवश्‍यक असलेले जातीय समीकरण व आर्थिक ताकद हेही मुद्दे विचारात घेऊनच उमेदवार ठरवले जात असल्यामुळे युती व आघाडी या दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या उमेदवारांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा केली जात आहे.

नागपूर - दोन विद्यमान केंद्रीय मंत्री, दोन माजी केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक दिग्गजांच्या लढती नागपूर विभागातील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये रंगणार आहेत. "अँटी-इन्कम्बन्सी'चा मुद्दा आणि निवडून येण्याच्या क्षमतेबरोबरच त्यासाठी आवश्‍यक असलेले जातीय समीकरण व आर्थिक ताकद हेही मुद्दे विचारात घेऊनच उमेदवार ठरवले जात असल्यामुळे युती व आघाडी या दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या उमेदवारांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा केली जात आहे. 2014 च्या निवडणुकीत एकही जागा न मिळवू शकलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीला यावेळी खाते उघडण्याची अपेक्षा असल्यामुळे सत्ताधीशांचे पत्ते पाहून हे विरोधक तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. 

उमेदवार निश्‍चितीच्या प्रक्रियेत या विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया अशा चार मतदारसंघांत जातीय समीकरणे अत्यंत प्रभावी ठरणार आहेत, असे सध्या तरी दिसते. त्याची चुणूक नाना पटोले यांची नागपूरसारख्या मतदारसंघात निवड करून कॉंग्रेसने दाखवली आहे. 

रामटेक व गडचिरोली-चिमूर हे अनुक्रमे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यामुळे तेथे फारसा "चॉईस' नाही. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध कॉंग्रेसने नाना पटोलेंचे नाव निश्‍चित झाले आहे. पण, बाहेरचा उमेदवार म्हणून स्थानिकांमध्ये धुसफूस आहे. आधीच शहरात कॉंग्रेसचे दोन गट आहेत. त्यात नाना गटाची भर पडेल असे दिसते. शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि दुसऱ्या गटाचे नितीन राऊत, प्रफुल्ल गुडधे यांचाही विरोध असल्याने नानांचा प्रचार कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यातच खैरलांजीचा विषय पटोलेंच्या विरोधात जाण्याची शक्‍यताही निर्माण झालेली आहे. गडकरींच्या विरोधात कुणबी उमेदवार दिला जाईल, हे जवळजवळ नक्की होते आणि तसेच घडले आहे. 

रामटेक मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांना युती झाल्याने मोठी मदत मिळणार आहे. मतदारसंघात सहज उपलब्ध होणार "आपला माणूस' म्हणून त्यांना ओळखले जाते. कॉंग्रेसने राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांचे नाव निश्‍चित केल्याचे सांगतात. यापूर्वी ते येथून खासदार होते. तसेच केंद्रात मंत्रीही होते. मात्र, त्यांच्याकडे पक्षाचा व्याप असल्याने ते मतदारसंघात फिरकत नाहीत. याबद्दलची नाराजी त्यांना मागील निवडणुकीत भोवली होती. पराभवानंतरदेखील ते मतदारसंघात क्वचितच आले. "आपला माणूस' की "दिल्लीचे साहेब' याच मुद्यावर रामटेकची निवडणूक होणार आहे. याशिवाय रामेटक लोकसभा मतदारसंघात सुनील केदार हे एकमेव कॉंग्रेस आमदार आहेत. तेसुद्धा वासनिक यांच्या विरोधात आहेत. 

वर्धा येथे कॉंग्रेसच्या चारुलता टोकस यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले आहे. पण, भाजपचा गोंधळ सुरू आहे. सागर मेघे यांच्या नावाचा विचार सुरू असला तरी विद्यमान खासदार रामदास तडस यांना तिकीट न दिल्यास मोठा व प्रभावशाली तेली समाज नाराज होण्याची शक्‍यताही विचारात घेतली जात आहे. सागर मेघे यांच्या उमेदवारीला भाजपातील प्रभावी गटाचे पाठबळ आहे. 

चंद्रपूरमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचा प्रचारही सुरू झाला. मात्र, कॉंग्रेसला अजून दमदार उमेदवार येथून मिळालेला नाही. मूळचे नागपूरचे व भाजपातून कॉंग्रेसमध्ये आलेले आशीष देशमुख यांच्या नावाची चर्चा आता सुरू झाली आहे. अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही. या मतदारसंघात अहीरांच्या विरोधात कुणबी उमेदवार द्यावा, यावर कॉंग्रेसमध्ये गांभीर्याने विचार सुरू आहे. 

गडचिरोली-चिमूर या अ. ज. राखीव मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांची उमेदवारी जवळजवळ निश्‍चित. कॉंग्रेसकडून डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

भंडारा- गोंदिया मतदारसंघातून एक तर माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल लढतील किंवा त्यांच्या पत्नी श्रीमती वर्षा पटेल. या दोघांनाही लढवायचे नाही असे ठरले तर राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांचाही विचार होऊ शकतो. भाजपने कुणबी उमेदवार दिला तर राष्ट्रवादीकडून कुकडेंची लॉटरी लागू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The predominance of ethnic equations in election