Loksabha 2019 : शंभर जागा हरल्या, तरी 'एनडीए'च सत्तेवर!

ज्ञानेश्‍वर बिजले 
शुक्रवार, 17 मे 2019

दोन्ही निवडणुकांदरम्यान पाच वर्षांच्या कालखंडात एनडीएतील काही मित्रपक्ष भाजपला सोडून गेले, तर काही मित्र नव्याने पुन्हा एनडीएत सहभागी झाले...

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत जिंकलेल्या शंभर जागा जरी हरल्या, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असेल. मात्र त्यापेक्षाही जास्त जागा गमावल्यास एकत्रित येणाऱ्या विरोधकांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

दोन्ही निवडणुकांदरम्यान पाच वर्षांच्या कालखंडात एनडीएतील काही मित्रपक्ष भाजपला सोडून गेले, तर काही मित्र नव्याने पुन्हा एनडीएत सहभागी झाले. मोदी लाटेत भाजपच्या मित्रपक्षांचे 54 खासदार निवडून आले. त्यावेळी देशातील एकूण 543 मतदारसंघांपैकी भाजपने 426, तर मित्र पक्षांनी 117 जागा लढविल्या. बहुमतासाठी 272 खासदारांची आवश्‍यकता असते. एनडीएचे 336 खासदार निवडून आले व त्यांनी सत्ता स्थापन केली. 

निवडून आलेल्यांपैकी तेलगू देशमने मोदी सरकारविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल करीत एनडीए सोडले. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरून बाहेर पडली. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून बिहारमधील केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांची राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएसपी) एनडीएतून बाहेर पडून युपीए आघाडीत सहभागी झाली. मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. या चार पक्षांचे 21 खासदार एनडीएतून बाहेर पडले. त्यामुळे एनडीएमध्ये 315 खासदार शिल्लक राहिले. 

नवे मित्र 

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एनडीएने तमिळनाडूत 39 पैकी 37 जागा जिंकलेल्या अण्णा द्रमुक पक्षाशी, तसेच बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड) यांच्याशी आघाडी केली. जद(यू)चे दोन खासदार आहेत. 315 खासदारांसमवेत हे 39 खासदार धरल्यास, एनडीएच्या खासदारांची संख्या 354 होते. बहुमतापेक्षा ही संख्या 82 ने जास्त आहे. यापैकी भाजपने आठ-नऊ जागा पोटनिवडणुकीत गमावल्या. 

मोदी लाटेत भाजपला उत्तर भारतात मोठे यश मिळाले. गुजरात, राजस्थानसह काही राज्यांत भाजपने सर्व जागा जिंकल्या. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश अशा मोठ्या राज्यांतही 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक यश मिळविले. त्यामुळे, या निवडणुकीत या राज्यांत भाजपला काही जागा गमवाव्या लागण्याची चिन्हे आहेत. तेथील जास्तीत जास्त जागा राखण्यासाठी भाजपचे नेतृत्व जिवाचे रान करीत आहेत. 

भाजप आता 437 जागा लढवित असून, 16 मित्रपक्षांसाठी त्यांनी 106 जागा सोडल्या आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, पंजाब, केरळ व आसाम या राज्यांतच त्यांच्या आघाडीतील मित्रपक्ष शंभर जागा लढवित आहेत. अन्य ठिकाणी भाजपचीच कॉंग्रेस अथवा प्रादेशिक पक्षांशी थेट लढत आहे. सुमारे तीनशे मतदारसंघात भाजप व कॉंग्रेस असाच सामना आहे. 

मित्रपक्षांची स्वबळावरच लढाई 

भाजपने केंद्रांत सत्ता राबविताना मित्रपक्षांच्या नेत्यांना फारशी मानाची वागणूक दिली नाही. त्यामुळे, अनेक राज्यांत त्यांच्यात बेबनाव झाला. मित्रपक्षांना फारशा जागाही नाहीत. तसेच निवडणुकीच्या रिंगणात त्यांना स्वबळावरच लढावे लागत आहे. त्यामुळे, मित्रपक्ष लढत असलेल्या 106 जागांपैकी 35 च्या आसपास जागा ते जिंकू शकतील असा अंदाज आहे. त्या त्या भागातील विविध बातम्या, स्थानिक राजकीय स्थिती, निवडणूक निकालाचे अंदाज यांच्या आधारे ही संख्या गृहीत धरली आहे. 

भाजपला त्यांनी जिंकलेल्या राज्यातच अनेक मतदारसंघांत अटीतटीचा सामना करावा लागत आहे. तेथे 70 ते 80 जागा जरी ते हरले, तरी पश्‍चिम बंगाल व ओरिसामध्ये त्यांना जादा जागा मिळतील. या राज्यातील 63 पैकी तीन जागा भाजपला गेल्या वेळी मिळाल्या होत्या. तेथील जागा पंधरा ते वीसपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. म्हणजेच भाजप 210 ते 230 यादरम्यान राहू शकेल. त्यामध्ये मित्रपक्षांच्या जागा मिळविल्या, तरी ते अडीचशेचा टप्पा पार करू शकतात. म्हणजेच सध्याच्या एनडीएतील घटक पक्षांनी गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या 354 जागांपैकी शंभर जागा कमी झाल्या, तरी त्यांना सत्तेवर येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. 

मदतीला 'हे' धावतील 

एनडीएच्या मदतीला आंध्रप्रदेश व तेलंगणातील खासदार येतील. तेथील तेलगू देशमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी भाजपविरोधी आघाडीची जमवाजमव करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे त्यांचे स्थानिक विरोधक आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि टीआरएसचे नेते व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा कल आपोआपच भाजपच्या बाजूने राहील. या दोन्ही पक्षांचे तीस खासदार निवडून येण्याची शक्‍यता आहे. 2014 मध्ये टीआरएसचे 11, तर वायएसआरचे 9 खासदार निवडून आले होते. राव सध्या जरी तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा करीत असले, तरी एनडीएला बहुमतासाठी जागा कमी पडल्यास, ते प्रथम साह्याला धावून येतील. रेड्डी यांची आंध्रप्रदेशसाठी विशेष राज्याची मागणी आहे. मात्र, सध्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बहुमत मिळाल्यास, तेही केंद्रातील सत्तेशी जुळवून घेतील. 

या दोन पक्षांव्यतिरिक्त ओरिसातील बिजू जनता दल (बीजेडी)चे नेते मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी देखील पाठिंब्याबाबत भाजप संपर्क करू शकतो. त्यांचेही दहा-बारा खासदार निवडून येण्याची शक्‍यता आहे. अन्य लहान पक्षांचाही पाठिंबा मिळविता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Although losing a hundred seats in Loksabha elections NDA will be in power