Loksabha 2019 : इंद्रप्रस्थावर वर्चस्वासाठी रस्सीखेच... (मतसंग्राम-दिल्ली)

अनंत बागाईतकर 
शुक्रवार, 10 मे 2019

राजधानी दिल्लीत भाजप, कॉंग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत आहे. पाठोपाठ होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे इथल्या घडामोडींकडे त्याची मोर्चेबांधणी म्हणून पाहिले जात आहे. 

राजधानी दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. 2014 मध्ये "इंद्रप्रस्थ' भाजपच्या वाट्याला गेले. परंतु, लोकसभेनंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला तीन आणि कॉंग्रेसला शून्य जागांवर आणून धक्काच दिला. आता दिल्लीत भाजपला आव्हान देण्याच्या स्थितीतील स्थानिक पक्ष म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष (आप) ओळखला जातो. भाजपसारख्या साधनसंपत्तीने प्रबळ, सुसंघटित पक्षाशी मुकाबल्याची ताकद ना कॉंग्रेसकडे आहे ना "आप'मध्ये! त्यामुळेच दोन्ही पक्षांनी परस्पर निवडणूक समझोत्याचा असफल प्रयत्न केला. परंतु, "आप'कडे किमान दिल्लीत सरकार असल्याने थोडीफार ताकद तरी आहे. कॉंग्रेसकडे काहीच नसल्यामुळे दिल्लीत विषमतेची लढाई दिसते. 

भाजपने सातपैकी दोन लोकप्रतिनिधींना उमेदवारी नाकारली. "आप'ने तरुण, ताजेतवाने चेहरे रिंगणात उतरवलेत. कॉंग्रेसने परंपरागत, जुन्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी दिली आहे. दिल्ली भाजपचा बालेकिल्ला राहिल्याने भाजपमध्ये काहीसा अधिक आत्मविश्‍वास दिसतोय. "आप'च्या कार्यकर्त्यांत भाजपला टक्कर देण्याचा लढवय्येपणा, उत्साह दिसतोय. कॉंग्रेसचा परंपरागत प्रचारावर भर आहे. मुख्यतः माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत दिल्लीच्या झालेल्या कायापालटाच्या आधारे मते मागितली जाताहेत. दिल्लीला अनुभवी, परिपक्व नेतृत्वाची गरज असल्याचे बिंबवण्यात येत आहे. त्याचबरोबर "आप'चा आणि केजरीवाल यांचा भांडकुदळपणा, केंद्राशी सातत्याने संघर्षाची भूमिका, यामुळे दिल्लीच्या विकास आणि प्रगतीला बसलेल्या खिळेकडे लक्ष वेधले जातेय. त्याचप्रमाणे कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातर्फे दिल्लीसारख्या राजधानीच्या महानगराची सूत्रे ही राष्ट्रीय भूमिकेच्या राष्ट्रीय पक्षांकडे असली पाहिजेत, असा मुद्दाही ठासून सांगितला जातोय. 

"आप'तर्फे आतिषी (पूर्व दिल्ली), दक्षिण दिल्लीतून राघव चढ्ढा या उमेदवारांच्या विजयाची भाकिते केली जाताहेत. दोघेही तरुण आणि "आप'चे प्रवक्ते आहेत. दोघेही अभ्यासूपणे आणि शांतपणे प्रवक्तेपदाची जबाबदारी कशी पार पाडायची, याबद्दल आदर्श मानले जातात. तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. दिल्लीत तिरंगी लढतीमुळे भाजपमध्ये काहीशी बेफिकिरी आढळते. तिरंगी लढतीचा फायदा आपल्यालाच, असा आत्मविश्‍वास भाजपमध्ये जाणवतोय. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या जादूई व्यक्तिमत्त्वाचे सान्निध्य दिल्लीकरांना असल्याने त्याचा फायदाही आपोआपच मिळणार, अशी खात्रीही त्यांना आहे. 

परंतु, प्रचार संपत असताना रामलीला मैदानावरील पंतप्रधानांच्या सभेच्या बरोबरीनेच कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींच्या "रोड शो'मधील गर्दी लक्षणीय होती. त्यामुळे "आप'मध्येही काहीशी अस्वस्थता दिसते. बहुधा या चिंतेमुळेच केजरीवालांनी लगोलग निवेदनाद्वारे "प्रियांकांनी दिल्लीत "रोड शो'त वेळ घालवू नये,' असे म्हटले आणि कॉंग्रेसच्या उत्साहाला आवरण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे तिरंगी लढतीत विरोधकांची मते विभागून त्याचा फायदा सत्ताधाऱ्याला होण्याची शक्‍यता अधिक असते. परंतु, दिल्लीत कॉंग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष रिंगणात असल्याने परंपरागत मतदारांमध्ये फाटाफूट होऊन त्याचा लाभ "आप'सारख्या पक्षाला होऊ शकतो.

अर्थात, दिल्लीतली भाजपची पाळेमुळे फारच खोलवर आणि बळकट असल्याने भाजप इतरांच्या तुलनेने वरचढ आणि सुस्थितीत असल्याचे जाणवते. दिल्लीतील व्यापारी, व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय ही भाजपची "व्होटबॅंक'. नोटाबंदी आणि जीएसटीच्या आघाताने पंगू झालेल्या व्यापारी आणि व्यावसायिक वर्गाने भाजपविरोधाची भूमिका घेतली होती. परंतु, पंतप्रधानांनी त्यांची मोठी बैठक घेऊन अडचणींच्या निराकरणासाठी उपाययोजनांची घोषणा केल्याने कदाचित हा वर्ग पुन्हा भाजपला मतदान करील, असे मानले जाते. रिंगणात असूनही कॉंग्रेसला विजयाची फारशी खात्री नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच ते या निवडणुकीकडे पाहत आहेत. "आप'साठी मात्र ही निवडणूक महत्त्वाची आहे. पक्षाची भरपूर झालेली पडझड आणि गळतीच्या पार्श्‍वभूमीवर त्याला एक-दोन जागा जिंकता आल्या, तर डागडुजी होऊन विधानसभेला पक्ष सुसज्ज करण्यासाठी वाव मिळेल, अशी स्थिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Political Analysis by anant bagaitkar