Loksabha 2019 : भाजप सरकार जाहिरातबाजीतच पुढे : पार्थ पवार

हेमंत देशमुख
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

सत्ताधारी भाजप सरकार कामांचे भूमिपूजन आणि फक्त जाहिरातबाजीच करत आहे.

- पार्थ पवार

कर्जत (जिल्हा रायगड) : सत्ताधारी भाजप सरकार फक्त कामांचे भूमिपूजन आणि जाहिरातबाजीच करत आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यानंतर त्यातील किती कामे पूर्ण झाली. याबद्दल शंका असून, भाजप सरकार जनतेला मूर्ख बनवित आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी केली.

कर्जत प्रचार दौऱ्यावर असताना पार्थ पवार बोलत होते. ते म्हणाले, जर सत्ताधाऱ्यांना वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारणे शक्य होते. तर मग छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अद्यापि का उभारले नाही, असा सवाल केला. तसेच आमच्यावर जे धरणांच्या कामांवरून आरोप केले. त्यात काहीच निष्पन्न झाले नाही. खरे सत्य लोकांसमोर आले आहे. आमचे सरकार आल्यास एक लाख लोकांना रोजगार मिळवून देण्यासोबतच कर्जत परिसराचाही विकास करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

या सभांना ग्रामीण भागातील नागरिकांनी भर उन्हातही हजेरी लावली. यावेळी आमदार सुरेश लाड, माजी सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हा परिषद सद्यस्य सुधाकर घारे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अरविंद पाटील, राष्ट्रवादीचे अशोक भोपतराव, शेकापचे विलास थोरवे, रायगड जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे ,शेकाप तालुका सचिव प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Government is ahead of only for Advertisment says Parth Pawar