Loksabha 2019 : बालाकोटचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेस नेत्याला राॅकेटला बांधूनच पाठविले असते : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

पुलवामा घटनेनंतर भारतीय जवानांनी धाडसी कारवाई करीत बालाकोटमध्ये कारवाई केली. या कारवाईचे पुरावे दोनच जण मागत आहेत. त्यात एक पाकिस्तान आणि दुसरे काँग्रेस नेते. पुरावे काय मागता, आधी सांगितले असते तर राॅकेटला बांधूनच एखाद्या काँग्रेस नेत्याला पाठविले असते. - मुख्यमंत्री

अकोला : पुलवामा घटनेनंतर भारतीय जवानांनी धाडसी कारवाई करीत बालाकोटमध्ये कारवाई केली. या कारवाईचे पुरावे दोनच जण मागत आहेत. त्यात एक पाकिस्तान आणि दुसरे काँग्रेस नेते. पुरावे काय मागता, आधी सांगितले असते तर राॅकेटला बांधूनच एखाद्या काँग्रेस नेत्याला पाठविले असते आणि भारतीय सैन्याने कोणता पराक्रम पाकिस्तानमध्ये जाऊन दाखविला हे प्रत्यक्ष बघता आले असते, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. 

भाजप-शिवसेना युतीचे अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी अकोला शहरातील डाबकी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या जाहीर सभेला जिल्ह्यातील विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, युतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, बुडलाणा जिल्ह्यातील भाजप, शिवसेनेचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी, वाशीम जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. फडणवीस यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच देश सुरक्षेच्या मुद्यावरून करताना सुरक्षा व विकासाच्या मुद्यावर मतांचा जोगवा अकोलेकरांना मागितला. 

काँग्रेस नेते व चेलेटपाट्यांचीच गरीबी दूर 
या देशाने 60 वर्षे अन्याय, भ्रष्टाचारी, भुलथापा देणारे सरकार पाहिले असल्याचे ते म्हणाले. या देशात 60 वर्षांत जे जलमे नाही ते मोदींच्या नेतृत्वात पाच वर्षांत करून दाखविल्याचा दावाही त्यांनी केला. पाच-पाच पिढ्यांपासून एकच घोषणा करीत आहे, यांना लाज कशी वाटत नाही. पणजोबा, आजी, वडिल, आई आणि आता राहुल गांधी यांनीही तीच घोषणा केली. मोदी सरकारने 34 लाख कुटुंबांना जनधन खाते उघडत बँकेच्या प्रवाहात आणले. त्यामुळे सरकारी योजनांमधील दलाल राज संपुष्टात येऊन थेट 100 टक्के लाभ नागरिकांना मिळाला. 60 वर्षांत काँग्रेसने त्यांच्या नेत्यांची चेलचपाट्यांचीच गरीबी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची प्रखर टीका मुख्यमंत्र्यांनी  केली. 

राहुल गांधींचे भाषण म्हणजे मनोरंजन 
सध्या राहुल गांधी यांची भाषणं एेकली की चांगलेच मनोरंजन होते. टीव्हीवाले एखादी सिरियल दाखविताना त्यातील पात्र, कथा घटनांबाबत सूचना देतात. पुढे राहुल यांचे भाषण दाखवितानाही अशीच सूचना टिव्हीवाले करतील, असा टोमणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांना मारला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis criticized the Congress on air stick issue