Loksabha 2019 : आम्ही काढलेत मनसेच्या इंजिनाचे एक-एक भाग : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

प्रश्‍न न विचारणारा खासदार निवडायचा का?

- उदयनराजेंना पाडणारच

सातारा : राष्ट्रीय अस्मितेची ही निवडणूक आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हे ठरवणारी आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आहे. एक नरेंद्र पाटील किंवा देवेंद्र फडणवीस निवडून नाही आला तरी फरक पडणार नाही. मात्र, देश टिकला पहिजे. त्यासाठी धनुष्यबाण मोदींच्या हातात द्या. याच धनुष्यबाणाच्या साहाय्याने ते देशद्रोही संपवतील असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच ताकद न उरल्याने विरोधकांनी इंजिन भाड्याने घेतले. मात्र, त्याचे एक-एक भाग आम्ही काढून टाकलेत, अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.  

भारतीय जनता पक्ष व शिवेसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आज येथील गांधी मैदानावर फडणवीस यांची जाहीरसभा झाली. यावेळी माजी आमदार मदन भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल - रूक्‍मिणी मंदीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, रिपाइंचे अशोक गायकवाड, रयत क्रांतीचे संजय भगत, पुरूषोत्तम जाधव, मनोज घोरपडे, महेश शिंदे, अमित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

फडणवीस म्हणाले, देशाचा सन्मान कोण ठेवणार, देश सुरक्षित कोण ठेवेल, विकास कोण करणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करणारा नेता मिळाला आहे. जनधन, उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, सर्वांसाठी घरे, शेतकरी सन्मान अशा विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाला थेट लाभ देण्याचे काम मोदी सरकारने केले. ऊसाला गेल्या चार वर्षात सर्वाधिक एफआरपी मिळाली. मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळेच चांगला दर मिळणे शक्‍य झाले आहे.

तसेच देशद्रोह्यांना व पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत देशाचा स्वाभिमान जपण्याचे काम मोदींनी केले आहे. सर्वच पातळीवर चांगले काम झाल्यामुळे विरोधकांकडे बोलण्यासाठी कोणतेच मुद्दे नाहीत. त्यामुळेच केवळ मोंदीवर टीका केली जात आहे.

नरेंद्र मोदी हे विरोधकांना संताजी-धनाजी प्रमाणे पाण्यात दिसत आहेत. रात्री दचकून उठत ते मोदी-मोदी करत आहेत. ही निवडणूक नरेंद्र पाटील यांची नाही. देशाला कोणत्या दिशेने नेणार आहोत, देश टिकला पहिजे यासाठीची ही निवडणूक आहे. राष्ट्रीय अस्मितेची तसेच मोंदीना पंतप्रधान करायचे हे ठरवणारी आहे. मोंदीचे हात बळकट करण्यासाठी धनुष्यबाणाच्या चिन्हाचे बटन दाबून नरेंद्र पाटील यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अशोक गायकवाड, मदन भोसले व नरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले तर, विजय काटवटे यांनी आभार मानले. 

मुख्यमंत्री म्हणाले...

- उदयनराजे सध्या सांगत असलेल्या एका कामाला त्यांच्या सत्तेच्या काळात निधी मिळाला का हे त्यांनी सांगावे. 
- ताकद न उरल्याने विरोधकांनी इंजिन भाड्याने घेतले. मात्र, त्याचे एक-एक भाग आम्ही काढून टाकलेत. त्यामुळे पवारसाहेबांनी कितीही प्रयत्न केला तरी, ते चालणार नाही. 
- जाणत्या राजाला हवेची दिशा कळते. त्यामुळेच माढ्याच्या मैदानातून त्यांनी माघार घेतली. 
- पराभूत माणसिकतेतूनच विरोधक मैदानात उतरलेत 
- कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आश्‍वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा. एकही पूर्ण करू शकणार नाहीत. 
- साताऱ्यात विविध कामांसाठी 75 कोटींची निधी दिला. 

हॉटेलवाल्यांच्या फायद्यासाठी ग्रेड सेपरेटर

पोवई नाक्‍यावर फ्लाय ओव्हरचे काम अत्यंत कमी पैशात झाले असते. परंतु, त्यामुळे पोवई नाक्‍यावर काही हॉटलेवाल्यांचे नुकसान झाले असते. त्यांच्या फायद्यासाठी ग्रेड सेपरेटरचा घाट घातला गेल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी आज सभेत केला. या निर्णयामुळे सर्वसामान्य सातारकरांना वर्षभर विनाकारण हाल सोसावे लागत असल्याचेही ते म्हणाले. 

प्रश्‍न न विचारणारा खासदार निवडायचा का?

छत्रपतींचे वशंज व उमदे व्यक्तिमत्व म्हणून उदयनराजेंना दोन निवडणुकांमध्ये पाठिंबा दिला. त्यांचा प्रचार केला. मात्र, जिल्ह्याचा विकास करतील, संसदेत आवाज उठवतील ही आमची अपेक्षा फोल ठरली. उदयनराजेंची संसदेतील उपस्थिती केवळ 26 टक्के आहे. त्याहून आश्चर्य म्हणजे त्यांनी लोकसभेत शून्य प्रश्‍न मांडले. त्यामुळे आपले मुद्देच न मांडणार खासदार निवडायचा का असा प्रश्‍न माजी आमदार मदन भोसले यांनी उपस्थित केला. 

उदयनराजेंना पाडणारच 

नरेंद्र पाटील यांनी आजच्या सभेत उदयनराजेंवर जोरदार हल्ला चढविला. विकासाबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर खासदार काही बोलत नाहीत. संसदेत जायला त्यांना जमत नाही. आत्ता मोंदीवर टीका करतायत, संसदेत बोलायला काय तोंड शिवले होते का ? जिल्ह्यावरील दहशतीचे सावट घालवण्यासाठी, उद्योग-धंदे आणून युवकांची रोजगारासाठीची भटकंती थांबविण्यासाठी, जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती मिळविण्यासाठी व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी उदयनराजेंना पाडणार म्हणजे पाडणारच असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात परिवर्तनाची लाट आहे, पाच वर्षासाठी मला संधी द्या, अशी सादही त्यांनी यावेळी जनतेला घातली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis Criticizes Raj Thackeray and Their MNS Party