Loksabha 2019 : राहुल यांना नोटीस ही बौद्धिक दिवाळखोरी : काँग्रेस

वृत्तसंस्था
Wednesday, 1 May 2019

पंडित नेहरूंचा पणतू आणि इंदिरा गांधींच्या नातवाच्या नागरिकत्वविषयी शंका घेतली जात असेल, तर अशा मंडळींना डॉक्‍टरलाच दाखवायला हवे. 

- गुलाम नबी आझाद, काँग्रेस नेते

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून गृह खात्याने बजावलेल्या नोटिशीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने असले मुद्दे म्हणजे भाजपची बौद्धिक दिवाळखोरी असल्याची टीका केली. जनतेशी निगडित प्रश्‍नांची उत्तरे देणे शक्‍य नसल्यामुळेच लक्ष दुसरीकडे वळविणारे यासारखे निरर्थक मुद्दे उपस्थित केले जात असल्याचा हल्लाही कॉंग्रेसने चढवला आहे. 

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व हरियानाचे प्रभारी सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी भाजपकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांची खिल्ली उडवली. राजकीय मुद्द्यांबाबत भाजपची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट झाली आहे. राहुल गांधी पंधरा वर्षांपासून खासदार असताना दर पाच वर्षांनी त्यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो. निवडणुकीत दिलेली पोकळ आश्‍वासने पूर्ण करता येत नसल्यामुळेच लक्ष इतरत्र वळविण्याचा हा प्रकार आहे, असा टोला त्यांनी लगावला.

पक्षाचे माध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनीही मोदी सरकारवर तोफ डागली. राहुल गांधी जन्माने भारतीय नागरिक आहेत, हे साऱ्या जगाला माहिती आहे; परंतु बनावट गोष्टींवरून राहुल गांधींना नोटीस बजावण्यात आली आहे. रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, काळ्या पैशावर मोदींकडे उत्तर नाही. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ही बनावट गोष्ट पुढे करण्यात आल्याचे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress React After Rahul Gandhi gets Notice