Loksabha 2019 : भाजपचा आता बालेकिल्ल्यातच संघर्ष!

ज्ञानेश्‍वर बिजले
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

- निवडणुकीच्या पुढील चार टप्प्यांत मतदान होणाऱ्या तेरा राज्यांत 240 जागांमध्ये भाजप व मित्रपक्षांचे 186 खासदार, तृणमूलचे 30 तर उर्वरित पक्षांचे 24 खासदार आहेत. 

लोकसभा निवडणुकीसाठी 303 मतदारसंघात मतदान झाले. आता उर्वरीत लढाई आहे ती भाजपच्या एरियातच. कॉंग्रेस व प्रादेशिक पक्षांकडे गमावण्यासारखे काहीच नाही. त्यांचे नेते जमिनीवरील प्रश्‍न मांडत हल्ले तीव्र करीत आहेत. त्या तुलनेत भाजपचा प्रचार फ्लॉप ठरू लागलाय. भाजपच्या दृष्टीने पुढील तीन आठवड्यातील प्रचाराची लढाई निकराची ठरणार आहे. 

निवडणुकीच्या पुढील चार टप्प्यात तेरा राज्यांत मतदान होईल. मतदान होणाऱ्या या 240 जागांमध्ये भाजपचे 186 खासदार असून, त्यामध्ये शिवसेना, अपना दल व अकाली दलाच्या खासदारांचाही समावेश आहे. तृणमूल कॉंग्रेसचे तीसजण आहेत. उर्वरीत 24 खासदारांमध्ये कॉंग्रेसचे सात, बिजू जनता दलाचे सहा, आपचे चार, झारखंड मुक्ती मोर्चा, इंडियन नॅशनल लोकदल व समाजवादी पक्ष यांचे प्रत्येकी दोन, तर राजदच्या एका खासदाराचा समावेश आहे. 

उत्तर भारतातील मुख्यत्वे हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये भाजपने 2014 च्या निवडणुकीत बहुतेक जागा जिंकत विरोधकांना भुईसपाट केले. कॉंग्रेसची अक्षरशः वाताहात झाली. कॉंग्रेस सरकारच्या निष्क्रीय व कथित गैरव्यवहारावर हल्ला करीत "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत भाजपने देशात सत्ता मिळविली. भाजपला जिथे भरपूर जागा मिळाल्या, त्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड, हरियाना, हिमाचल प्रदेश, दिल्ली येथे आता मतदान होणार आहे. त्याचबरोबर पंजाब, ओरिसा, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र, जम्मू व काश्‍मीर या राज्यातही मतदान होईल. 

भाजपकडेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त देशपातळीवर स्टार प्रचारक नाही. गेल्या निवडणुकीत मोदी यांची तत्कालिन सरकारवरील टीका, तसेच विकास कामे करण्याची आश्‍वासने यांमुळे त्यांच्यामागे जनमत संघटीत होत गेले. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादाच्या प्रचारावर भर दिला आहे. कॉंग्रेसच्या पूर्वाश्रमीच्या नेत्यांविरुद्धचे हल्ले, तर त्या त्या प्रदेशातील घराणेशाहीविरुद्धची टीका यांवर त्यांचे भाषण पूर्ण होत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी यासंदर्भात सत्ताधारी पक्षाकडून अद्याप ठोस प्रचार होत नाही. शहरातील मतदारांमध्ये अद्यापही सुप्त प्रमाणात मोदी लाट आहे. पण, ग्रामीण भागात मात्र ती लाट दिसून येत नाही. 
कॉंग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी तो धागा पकडला आहे. ते शेतकऱ्यांचे मुद्दे, बेरोजगारी अशा मुद्‌द्‌यांवरच प्रचारात भर देत आहेत. या पक्षांकडे आता गमावण्यासारखे काही राहिलेले नाही. त्यामुळे, त्यांचा प्रचार अधिक आक्रमक होऊ लागला आहे. कॉंग्रेसने न्याय योजना जाहीर केली. बेरोजगारी, लघुउद्योजक यांच्यासाठी काही उपाय करण्याचे आश्‍वासन दिले.

विरोधकांनी देशपातळीवर त्यांचा नेता जाहीर केला नसल्याने, भाजपला प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पातळीवर लढावे लागत आहे. तेथील प्रादेशिक नेते केंद्राने आपल्या राज्याला साह्य केले नसल्याचे सांगत भाजपवर टीका करीत आहेत. त्यामुळे भाजप पुढील निवडणुकीच्या प्रचारात आणखी आक्रमक होण्याची शक्‍यता आहे. भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञासिंह यांनी उमेदवारी दिली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भाषा आक्रमक होऊ लागली आहे. मोदी पुढील तीन आठवड्यात या राज्यांत जोरदार प्रचार सुरू करतील. 

उत्तर प्रदेशात विरोध 

उत्तर प्रदेशात सर्वांधिक 80 जागा असून, तेथील 54 जागांवरील मतदान शिल्लक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवत असून, त्यांच्यासोबत प्रचाराची धुरा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री राजनाथसिंह, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर आहे. गेल्यावेळी चौरंगी लढतीत गांधी कुटुंबातील दोघेजण, तर यादव कुटुंबांतील पाचजण वगळता उर्वरीत सर्व जागा भाजपने जिंकल्या. त्यापैकी चार जागांवरील मतदान अद्याप झालेले नाही. म्हणजेच भाजपच्या 50 जागांवर मतदान व्हायचे आहे. 

विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, सप- बसप-रालोद आघाडी झाली. त्यांचे एकत्रित मतदान भाजपच्या आसपास आहे. त्यांनी लोकसभेच्या तीन पोटनिवडणुका जिंकल्या. महागठबंधनने भाजपपुढे आव्हान उभे केले. त्यांनी कॉंग्रेसला सोबत न घेतल्याने, कॉंग्रेस स्वतंत्रपणे रिंगणात उतरली. महागठबंधनतर्फे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बसपच्या नेत्या मायावती यांनी भाजपविरोधी जोरदार प्रचार सुरू केला असतानाच, कॉंग्रेसतर्फे प्रियांका गांधी प्रचारासाठी गावोगाव फिरु लागल्या.

मोदी यांच्या पाच वर्षांतील कारभारावर त्या थेट हल्ला करताना, राष्ट्रवाद या भाजपच्या प्रचाराच्या मुख्य मुद्‌द्‌यावरही आघात करीत आहेत. लोकांना भेटून, त्यांचे प्रश्‍न सभांमध्ये मांडण्यावर त्यांनी भर दिला आहे. कॉंग्रेसच्या जागा फारशा निवडून येणार नसल्या, तरी त्यांची मतांची टक्केवारी वाढेल. मात्र, त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, ते त्या-त्या मतदारसंघातील उमेदवारांवरून ठरेल. मात्र, या तिघांमुळे भाजपची स्थिती बिकट झाली आहे. 

बिहारमध्ये गोंधळाची स्थिती

बिहारमध्येही लोकसभा निवडणुकीत भाजपने रामविलास पासवान व उपेंद्र कुशवाह यांच्या मदतीने गेल्या निवडणुकीत 40 पैकी 31 जागा जिंकल्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव व नितीशकुमार यांनी एकत्र येत भाजपला पराभूत केले. पुढे नितीनकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी केली. लोकसभा जागावाटपात नितीशकुमार यांच्या जद(यू) ला 17 जागा देताना, भाजपने स्वतःच्या पाच जागा दिल्या. भाजपने 22 ऐवजी 17 जागांवर लढण्याची तयारी दर्शविली.

पासवान यांना जागा देताना, कुशवाह यांच्या पक्षाला जागा सोडल्या नाहीत. ते लालूप्रसाद यादव यांच्यासोबत गेले. भाजप व जद(यू) चे कार्यकर्ते एकत्र आले नसल्याच्या काही मतदारसंघांत तक्रारी आहेत. तर विरोधी आघाडीतही तशीच स्थिती आहे. भाजपवर पक्षांतर्गत टीका करणाऱ्या खासदारांमध्ये बिहारमधील खासदारच पुढे होते. त्यामुळे, येथील राजकीय स्थिती गोंधळाची आहे.

जातीचे वर्चस्व येथील मतदारांवर प्रभाव टाकत असल्याने, तसेच गेल्या पाच वर्षांतील बिहारमधील राजकीय उलथापालथ लक्षात घेतल्यास, बिहारमध्ये एनडीएला विरोधी आघाडीपेक्षा जास्त जागा मिळाल्या, तरी गेल्या वेळेइतक्‍या मिळण्याची शक्‍यता कमी आहे. लगतच्या झारखंडमध्ये बिहारमधील वातावरणाचे पडसाद उमटतात. तेथे गेल्या वेळी 14 पैकी भाजपने 12 जागा जिंकल्या. तेथे कॉंग्रेस व स्थानिक पक्षांची आघाडी किमान निम्म्या जागा जिंकतील, अशी स्थिती आहे. 

मध्यप्रदेश व राजस्थानात काँग्रेसची लढत 

राजस्थानातील सर्व 25, तर मध्यप्रदेशातील 29 पैकी 27 जागा जिंकत भाजपने गेल्या वेळी घेतलेल्या आघाडीला, कॉंग्रेसने दोन्ही राज्यातील सत्ता भाजपकडून हिसकावून घेत आव्हान दिले. चार महिन्यांपूर्वीच झालेल्या या निवडणुकांमध्ये राजस्थानात कॉंग्रेसला भाजपपेक्षा एक टक्का जास्त मते आहेत, तर मध्यप्रदेशात मतदानात भाजपच किंचित पुढे आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष बरोबरीत आहेत. कॉंग्रेसला दोन्ही राज्यात काही जागा मिळतीलच. ते भाजपच्या किती जागा कमी करू शकणार, ते महत्त्वाचे. येथे या दोन पक्षातच थेट लढत आहे. 

पंजाबात काँग्रेस, हरियानात भाजप

पंजाबात कॉंग्रेसने सरकार स्थापन करताना अकाली दल-भाजप आघाडीला हरविले. या राज्यात आपचे चार खासदार निवडून आले. अकाली दलाचे चार, भाजपचे दोन, तर कॉंग्रेसचे तीन खासदार आहेत. भाजपचे खासदार अभिनेते विनोदखन्ना यांच्या निधनानंतर, कॉंग्रेस पोटनिवडणुकीत जिंकली.

भाजपने तेथे अभिनेते सनी देओल यांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसच्या जागा वाढण्याची शक्‍यता असून, आप व अकाली दलाच्या जागा कमी होतील. लगतच्या हरियानात भाजप पुढे आहे. तेथील इंडियन नॅशनल लोकदलाला किती मतदान होणार, त्यावर काही मतदारसंघातील निवडणुकांच्या निकालावर परिणाम होईल. 

दिल्लीत काँग्रेस व आप यांच्यात आघाडीची चर्चा झाली. मात्र, दोघेही स्वतंत्र लढणार आहेत. भाजपने गेल्यावेळी दिल्लीतील सातही जागा जिंकल्या. आता तिरंगी लढतीत भाजपला जागा राखण्यासाठी फायदा होऊ शकतो. 

महाराष्ट्र आणि ओरिसात शेवटच्या टप्प्याचे मतदान 29 एप्रिलला होत आहे. मुंबई व लगतच्या भागातील भाजप व शिवसेनेच्या 17 जागांवर मतदान होत आहे, तर ओरिसात बिजू जनता दलाच्या सहा जागांवर निवडणूक होत आहे. ओरिसात भाजपच्या जागा वाढतील. 

ममता बॅनर्जी आघाडीवर

पश्‍चिम बंगालमध्ये 32 जागांवर अद्याप मतदान व्हायचे आहे. त्यातील तीस जागा गेल्यावेळी तृणमूल कॉंग्रेसकडे होत्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तेथे तळ ठोकून आहेत. भाजप तेथे वाढत असल्याची चर्चा आहे. मात्र, डावी आघाडी, कॉंग्रेस यांची मते त्यांच्याकडे वळतील. पण, त्यामुळे जागा किती वाढतील, हा मोठा प्रश्‍न आहे. त्यांना आठ-दहा जागा मिळतील, असा दावा भाजप नेते करतात. मात्र, पुढील तीन आठवड्यात तेथे हिंदी बेल्टमधील राज्यातील प्रचार सोडून देशपातळीवरील भाजपचे नेते जाण्याची शक्‍यता कमी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Bijale Writes about BJPs Political Situation