Loksabha 2019 : ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी मुख्य दावेदार

ज्ञानेश्‍वर बिजले 
शनिवार, 18 मे 2019

ममताच्या जिवनावर चित्रपट 
मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात बंदी घातली आहे. ममता बॅनर्जी यांच्या जिवनावर आधारित "बाघिनी' हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. गीरच्या सिंहानंतर बंगालची वाघीण केंद्रात सत्तेवर असेच देशाच्या राजकारणाचे चित्र राहू शकेल.

लोकसभेचा निकाल 'त्रिशंकू' राहिल्यास, स्वबळावर लढलेल्या प्रादेशिक पक्षांना महत्त्व येईल. एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते एकत्र आल्यास, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी मुख्य दावेदार ठरतील. 

भाजपला दोनशेच्या आसपास जागा मिळाल्या, तर एनडीएला पुन्हा सत्ता मिळविणे अवघड आहे. कॉंग्रेसने पंतप्रधानपद घेण्यापेक्षा इतरांना संधी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना किती जागा मिळणार, ते यंदा महत्त्वाचे ठरेल. तृणमूल कॉंग्रेस वगळता कोणत्याही पक्षाला यंदा वीसपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्‍यता नाही. उत्तरप्रदेशात सप-बसप महागठबंधन किती जागा मिळविणार, याकडेही सर्वांचे लक्ष असेल. 

भाजप व कॉंग्रेस सोडल्यास, 2014 च्या निवडणुकीत तीन पक्षांना वीसपेक्षा अधिक जागा, तीन पक्षांचे दहा ते वीसच्या दरम्यान खासदार, तसेच पाच पक्षांचे खासदार पाच ते दहाच्या दरम्यान होते. या अकरा पक्षांच्या स्थितीत, यंदा काय बदल होणार, याचा अंदाज बांधल्यास देशाची स्थिती समजून येईल. या व्यतिरिक्त मायावती यांचा बसप आणि तमिळनाडूतील द्रमुक यांचा एकही उमेदवार गेल्या निवडणुकीत निवडून आला नव्हता. त्या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी यंदा सभागृहात असतील. 

भाजपच्या एनडीएला 2014 मध्ये 336 जागा, कॉंग्रेसच्या युपीए आघाडीला साठ जागा मिळाल्या. या आघाड्यांव्यतिरिक्तच्या अन्य पक्षांकडे 147 जागा होत्या. तमिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णा द्रमुकने सर्वांधिक 37 जागा, तर त्यापाठोपाठ पश्‍चिम बंगालच्या तृणमूल कॉंग्रेसने 34 जागा जिंकल्या. अण्णा द्रमुकने आता भाजपसोबत, तर द्रमुकने कॉंग्रेससोबत आघाडी केली. त्यांच्या जागा त्या आघाडीत मोजल्या जातील. 

भाजपला "जशास तसे' उत्तर 
भाजपला उत्तर भारताव्यतिरिक्त पश्‍चिम बंगाल आणि ओरिसातून जादा जागा मिळण्याची आशा आहे. दक्षिण भारतावरही त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपच्या या आक्रमकतेला पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने जशास तसे उत्तर दिले. तेथे अक्षरशः रस्त्यावरील लढाईही त्यांना मोदी-शहा जोडीला जोरदार प्रत्युत्तर दिले. बंगालच्या भूमीवर शिरकाव करताना भाजपला जोरदार प्रतिकार सहन करावा लागला. तृणमूल कॉंग्रेसचा राज्यात दबदबा असून, भाजपनेही तेथे मतदारांचे चांगले पाठबळ मिळविले आहे. कॉंग्रेस, डावी आघाडीचे मतदार भाजपकडे वळाले. तरीदेखील, तृणमूलचे तीस खासदार निवडून येतील असा अंदाज वर्तविला जात आहे. भाजपही आठ-दहा जागा मिळवील. त्यामुळे "त्रिशंकू' स्थितीतील लोकसभेमध्ये सत्तेचा निर्णय घेण्यासाठी ममतादीदी महत्त्वाचा घटक ठरणार आहेत. 

नुकत्याच पत्रकारांशी संवाद साधताना ममता दीदी म्हणाल्या, ""केंद्रात मोदी पुन्हा सत्तेवर येत नाही. उत्तरप्रदेशातील महागठबंधन, तृणमूल, बिजू जनता दल व अन्य प्रादेशिक पक्षच केंद्रातील सत्तेचा निर्णय घेतील.'' 

ओरिसात बीजेडी आघाडीवर 
लगतच्या ओरिसामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूक आहे. राज्यात वीस वर्षे सत्ता टिकवूनही मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यामागे जनमत आहे. बिजू जनता दलाने (बीजेडी) गेल्या निवडणुकीत एकवीसपैकी वीस जागा जिंकल्या. त्यापैकी काही जागा यंदा भाजप जिंकेल. तरीदेखील दहा-बारा जागा बिजू जनता दलाला मिळतील. त्यांनी भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना विरोध जाहीर केला आहे. प्रादेशिक पक्षच दिल्लीतील सत्तेचा निर्णय घेतील, असे पटनाईक यांनीही स्पष्ट केले. 

उत्तरप्रदेशचा निकाल महत्त्वाचा 
देशातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हणतात. तेथील 80 जागांसाठी भाजपसमोर सप-बसप गठबंधनने मोठे आव्हान उभे केले. सप-बसपला निम्म्या म्हणजे 40 जागा मिळाल्या, तरी केंद्रात त्यांचा दबदबा राहील. पाच वर्षांपूर्वी त्यांचेही खासदार मोठ्या संख्येने असत. मायावती मुख्यमंत्री असताना, 2009 मध्ये बसपचे 21 खासदार होते. तर, 2014 पूर्वीच्या तीन्ही निवडणुकांत सपचे वीसपेक्षा अधिक खासदार होते. महागठबंधनच्या वाढणाऱ्या जागा थेट भाजपला फटका बसणाऱ्या असतील. मायावती यांचे नावही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत घेतले जाते. 
पंतप्रधान कोण, या प्रश्‍नाला उत्तर देताना, सपचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, ""मी तरी त्या शर्यतीत नाही. ज्याचे नशीब जोरावर असेल, तो यंदा पंतप्रधान बनेल.'' 

आंध्र, तेलंगणाचा कल कोणाकडे 
दहा ते वीसच्या दरम्यान खासदार असलेल्या पक्षांमध्ये शिवसेना, तेलगू देशम (टीडीपी) आणि तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) यांचा समावेश आहे. शिवसेना यंदाही एनडीएमध्ये आहे. तेलगू देशमने भाजपची साथ सोडली असून, ते विरोधी पक्षांची एकजूट करण्यात मग्न आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांच्या खासदारांची संख्या घटणार आहे. तेलंगणात टीआरएसचे खासदार वाढतील. आंध्र प्रदेश व तेलंगणात मिळून 42 खासदार आहेत. या दोन पक्षांसोबत वायएसआर कॉंग्रेस या तिघांमध्ये येथील बहुतांश जागा वाटल्या जातील. भाजप व कॉंग्रेसला तेथे एखाददुसरी जागा मिळेल. तेलगू देशम कॉंग्रेस आघाडीकडे वळाल्याने, अन्य दोन पक्ष आपोआपच भाजपकडे वळतील. मात्र, केंद्रात प्रादेशिक पक्षांची सत्ता येणार असल्यास, या दोन राज्यांत सत्तेवर असलेले मुख्यमंत्री त्यांच्यासोबतही जाऊ शकतील. 

तृणमूल, सप-बसप, बिजू जनता दल, टीडीपी, टीआरएस आणि वायएसआर या सहा पक्षांचेच खासदार 120 च्या आसपास असतील. यांच्याव्यतिरिक्त डाव्या आघाडीचे सध्या दहा खासदार आहेत. त्यांच्या संख्या फारशी वाढणार नाही. अन्य लहान पक्षांचे दहा - बारा खासदार असतील. म्हणजेच 543 पैकी या सर्व पक्षांचे खासदार 140 च्या आसपास असतील. 2014 च्या निवडणुकीत या अन्य पक्षांच्या खासदारांची संख्या 147 होती. एनडीए व युपीए या दोन्ही आघाड्यांच्या खासदारांची संख्या गेल्या वेळी चारशेच्या आसपास होती, यंदाही तेवढीच राहील. त्यामुळे एनडीएच्या जागा 225 च्या आसपास राहिल्यास, युपीएकडे 150 ते 175 जागा असतील. 

कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी 23 मे रोजी विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली आहे. तेव्हा प्रादेशिक पक्षांत सर्वांधिक जागा मिळविलेला तृणमूल कॉंग्रेस पंतप्रधान पदासाठी आग्रही राहील. अन्य नेत्यांमध्ये पक्ष व राज्यातील सत्तेनुसार काही मतभेदही निर्माण होऊ शकतील. गेल्या वर्षभरात विरोधकांमध्ये ऐक्‍य आणण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. 

ममतादीदीची राजकीय कारकीर्द 
ममतादीदी 29 व्या वर्षी 1984 मध्ये खासदार झाल्यानंतर, 1989 चा अपवाद वगळता 2009 पर्यंत सातवेळा कलकत्त्यातून लोकसभेवर निवडून आल्या. 1991 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर, त्या अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री होत्या. 2011 पासून त्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. साधी राहणी, आक्रमक राजकारणी, सर्वसामान्य जनतेसाठी लढा हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ठ्य. 

ममताच्या जिवनावर चित्रपट 
मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात बंदी घातली आहे. ममता बॅनर्जी यांच्या जिवनावर आधारित "बाघिनी' हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. गीरच्या सिंहानंतर बंगालची वाघीण केंद्रात सत्तेवर असेच देशाच्या राजकारणाचे चित्र राहू शकेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Bijale writes about Mamata Banerjee is top contender for PM post