Loksabha 2019 : असंवेदनशील सरकारमुळे 18 हजार शेतकऱ्यांची आत्महत्या : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 April 2019

सटाणा : गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शेतमालाचा भाव व शेती सिंचनासह शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळेच बळीराजाची मोठी दैना झाली असून राज्यातील 18 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. अशा या असंवेदनशील भाजप-शिवसेना महायुतीच्या शासनाचा या निवडणुकीत सर्वांनी मिळून पराभव करावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शनिवारी (ता.27) येथे केले.

सटाणा : गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शेतमालाचा भाव व शेती सिंचनासह शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळेच बळीराजाची मोठी दैना झाली असून राज्यातील 18 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. अशा या असंवेदनशील भाजप-शिवसेना महायुतीच्या शासनाचा या निवडणुकीत सर्वांनी मिळून पराभव करावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शनिवारी (ता.27) येथे केले.

सटाणामधील पाठक मैदानावर धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार दीपिका चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्रबापू पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, उमेदवार आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार आदी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, गांधी व नेहरू घराण्याने देशासाठी काय केले, हा प्रश्न विचारणार्‍या मोदींनी या घराण्याच्या बलिदानाचा इतिहास अवश्य पाहावा. मृत व्यक्तीच्या टाळूवरचे लोणी खाणारी माणसे केंद्रात सत्तेत बसली असून हुतात्मा जवानांच्या आत्मबलिदानाचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जात आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवून आणण्याचा पराक्रम मिरविणार्‍या व 56 इंच छाती म्हणवून घेणार्‍या मोदींनी पाकिस्तानी जेलमध्ये खितपत पडलेल्या कुलभूषण जाधव यांना सुखरूप भारतात का आणता आले नाही. 

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या कुटुंबीयांची भूमिका शेतकऱ्यांशी नाळ जोडणारी होती. मात्र डॉ. भामरे यांना ते टिकवून ठेवता आले नाही. हुतात्मांच्या कुटुंबीयांना त्यांनी कधीच धीर दिला नाही. डॉ. भामरे यांच्या संवेदनाच नाहीशा झाल्या आहेत. महाराष्ट्राचे हक्काचे पाणी राज्याचे मुख्यमंत्री फडवणीस हे मोदींच्या दबावामुळे गुजरातकडे वळविण्याचा घाट घालीत आहे. मात्र ते आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. शेतीसिंचनाचे प्रश्न मार्गी न लागल्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मात्र बागलाणचा शेतकरी प्रयोगशील आहे. आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात तब्बल 84 गावांमधील शेती सिंचनाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. मतदारांनी पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटेल या उद्देशासाठी उमेदवार कुणाल पाटील यांना लोकसभेत पाठवावे, असे आवाहनही पवार यांनी केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अच्छे दिन आयेंगे म्हणून नरेंद्र मोदी यांना निवडून दिले. मात्र गेल्या पाच वर्षात दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. शेतकरी कर्जबाजारी झाला. तरुण बेरोजगार झाले, तर सबका साथ सबका विकास गायब झाला. राफेल घोटाळा प्रकरणी डॉ. सुभाष भामरे यांची भूमिका संशयास्पद असून त्यांनी संसदेत खोटी माहिती देत जनतेला फसवले आहे. म्हणूनच तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांचे सर्व अधिकार काढून घेतल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. 

उमेदवार कुणाल पाटील, आमदार दीपिका चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. पगार, अद्वय हीरे, किशोर भामरे आदींची भाषणे झाली. सभेस अॅड. विजयबापू पाटील, पालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील, गटनेते काकाजी सोनवणे, यशवंत पाटील, दीपक पगार आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. 

चौगाव येथील अपंग शेतकरी समाधान शेवाळे यांनी स्वत: तयार केलेली बैलगाडी तर किरण मोरे या युवा शेतकरी व चित्रकाराने शरद पवार यांना शिवाजी महाराजांनी शेतकर्‍याला सोबत घेत असल्याची पेंटिंग भेट दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Unsensible Government 18 Thousand Farmers Committed Suicide says Sharad Pawar