Loksabha 2019 : आम्ही किल्ली फिरवू अन् अर्थव्यवस्था सुदृढ होईल : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

15 लाखांच्या आश्वासनांबाबत मोदी गप्प

- 22 लाख तरुणांना मिळणार सरकारी नोकरी

नवी दिल्ली : जसं ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकले जाते तशाच प्रकारे 'न्याय' योजना देशातील अर्थव्यवस्थेच्या इंजिनमध्ये डिझेलसारखी असेल. आम्ही डिझेल टाकू, चावी फिरवू आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरु होईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच आमचे सरकार सत्तेत आल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.

बिहारच्या पटणा येथे आयोजित जाहीरसभेत राहुल गांधी बोलत होते. पाटलीपुत्र या मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाकडून मीसा भारती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी येथे उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले, 'न्याय' योजना देशातील अर्थव्यवस्थेसाठी डिझेलसारखी काम करेल. या योजनेतून अनेकांना रोजगार मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लालूप्रसाद यादव, राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत असभ्य वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे आता निवडणुकीनंतर जनताच त्यांना उत्तर देईल.

15 लाखांच्या आश्वासनांबाबत मोदी गप्प

2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी भ्रष्टाचार आणि काळा पैसा या सर्व मुद्यांवर बोलत होते. तेव्हा त्यांनी जनतेच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, सध्या त्याबाबत ते कोणतेही भाष्य करत नाहीत.

22 लाख तरुणांना मिळणार सरकारी नोकरी 

पंतप्रधान मोदी यांनी 2 कोटी तरुणांना रोजगार मिळेल, असे सांगितले होते. मात्र, असे काहीही झाले नाही. सध्या 22 लाख सरकारी जागा रिक्त आहेत. आमचे सरकार सत्तेवर आल्यास एका वर्षात 22 लाख तरुणांना सरकारी नोकरी तर 10 लाख तरुणांना पंचायतीत रोजगार दिला जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Economy will be Strong Soon says Rahul Gandhi