Loksabha 2019 : प. बंगालमध्ये आजपासून प्रचारबंदी; हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाची कारवाई

पीटीआय
गुरुवार, 16 मे 2019

- उद्या (ता. 16) रात्री दहा वाजल्यापासून पश्‍चिम बंगालमधील नऊ मतदारसंघांमध्ये प्रचार बंदी केली लागू. 

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने उद्या (ता. 16) रात्री दहा वाजल्यापासून पश्‍चिम बंगालमधील नऊ मतदारसंघांमध्ये प्रचार बंदी लागू केली. यामुळे राजकीय पक्षांना सभा, रोड शो घेता येणार नाहीत. सोशल मीडियाच्या वापरावरदेखील निर्बंध घालण्यात आले असून राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचाराचे व्हिडिओ व्हायरल करता येणार नाहीत. पश्‍चिम बंगालच्या राज्य गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक राजीवकुमार आणि गृह विभागाचे मुख्य सचिव अत्री भट्टाचार्य यांचीही निवडणूक आयोगाने हकालपट्टी केली आहे. 

थोर समाजसुधारक पं. ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेबद्दल आयोगाने खेद व्यक्त केला आहे. राज्य सरकार या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करेल, अशी अपेक्षा आयोगाकडून व्यक्त करण्यात आली. आयोगाने राज्यघटनेच्या 324 व्या कलमाचा आधार घेत निवडणूक प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकत्यातील रोड शोदरम्यान मंगळवारी झालेल्या हिंसाचारादरम्यान सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करण्यात आली होती, तसेच थोर समाजसुधारक ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोडही करण्यात आली होती. 

भाजप-तृणमूल पुन्हा भिडले 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकत्यातील रोड शोदरम्यान मंगळवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आज सलग दुसऱ्या दिवशी राजकीय वर्तुळात उमटले. अमित शहा यांनी आज पुन्हा पत्रकार परिषदेत "तृणमूल'वर निशाणा साधला. "सीआरपीएफ' नसती, तर मी जिवंत परतलोच नसतो, असा दावा त्यांनी केला. तर, "तृणमूल'ने समाजसुधारक पं. ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची भाजप कार्यकर्त्यांनीच तोडफोड केल्याचा आरोप करीत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. 

या वादात अखेरच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उडी घेत ममतांनी लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप केला. या सगळ्या राड्यानंतर ममतांनीही आज सायंकाळी कोलकत्यात बलियाघाट ते श्‍यामबझारदरम्यान "विरोध मार्च' काढत आपणही मागे हटणार नसल्याचे दाखवून दिले. अमित शहांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचारात ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याने आता वंगभूमीतील राजकारणात नवा वाद पेटला आहे. अमित शहांनी या कृत्यासाठी "तृणमूल'ला जबाबदार ठरविले असले, तरी "तृणमूल'चे नेते डेरेक ओब्रायन यांनी हे कृत्य भाजप कार्यकर्त्यांचे असल्याचा आरोप केला.

"तृणमूल'च्या संसदीय नेत्यांच्या एका पथकाने आज निवडणूक आयोगाची भेट त्यांच्याकडे या घटनेचे पुरावे सादर केले. तृणमूल कॉंग्रेसने आज या घटनेचे पंधरा व्हिडिओ व्हायरल करीत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भाजपने बंगाली स्वाभिमानाला हात घातला असून, सध्या कोलकत्यामध्ये संतापाचे वातावरण आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनीच रोड शोदरम्यान हिंसाचार घडवून आणला. पश्‍चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आलेली केंद्रीय सुरक्षा दलेही कुजबूज पद्धतीने भाजपचा प्रचार करीत आहेत, असा आरोप ओब्रायन यांनी केला. 

Web Title: Election Campaign Stopped in West Bengal