Loksabha 2019 : बारामतीत मुख्यमंत्री घेणार सभा

मिलिंद संगई
बुधवार, 10 एप्रिल 2019

बारामती - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. शनिवारी (ता. 13) संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री बारामती तालुक्यातील सुपे येथे कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. भाजपचे सुरेंद्र जेवरे यांनी ही माहिती दिली. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, त्यांनी पूर्ण वेळ बारामतीसाठी दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनी स्वताःहून घेतली आहे. त्यांच्या पाठोपाठ आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या रणांगणात उडी मारली आहे. ते आता कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सुपे येथे सभा घेणार आहेत.

सुपे येथील बसस्थानकानजिक असलेल्या मोकळ्या मैदानावर मुख्यमंत्र्यांची सभा होईल. प्रारंभापासून शरद पवार व अजित पवार यांच्या विरोधात फडणवीस यांनी धार तीव्र केली होती. आता निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पवार कुटुंबियाना लक्ष्य केले असल्याने फडणवीस काय बोलणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. पंतप्रधानांच्या सभेची अनिश्चितता असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची एक तरी सभा बारामती तालुक्यात व्हावी असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यानुसार आता शनिवारी मुख्यमंत्र्यांची तोफ बारामतीत धडाडणार आहे. 

गेल्या काही वर्षात सुप्रिया सुळे यांनीही अनेकदा मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केलेली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बारामतीत येऊन काय बोलतात याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fadnavis will be in Baramati for BJP campaigning