Loksabha 2019 : मतदानाचे चित्रीकरण सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा 

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 23 एप्रिल 2019

मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने नियमावली घोषित करूनही सर्रास त्याची पायमल्ली होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.23) झालेल्या मतदानाप्रसंगी एका व्यक्‍तीने मतदान कक्षामध्ये मोबाईलद्वारे चित्रीकरण करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यानंतर याबाबतचे वृत्तदेखील विविध वेबपोर्टलच्या माध्यमातून लोकांसमोर आले. त्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात नियुक्‍त नायब तहसीलदार सिद्धार्थ धनजकर यांनी तक्रार दाखल केली. 
त्यानंतर सायबर पोलिस विभागाने अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल दाखल केला. 

धनजकर यांनी तक्रारीत म्हटले, की एका व्यक्‍तीने मतदान कक्षामध्ये इव्हीएम मशीनचे व मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केल्याचे दिसून आले. या व्यक्‍तीने प्रत्यक्ष मतदान करतानाचा एक संगीतमय व्हिडीओ तयार करून तो टिकटॉक या सोशल साईटवर अपलोड करून व्हायरल केला. यामुळे निवडणुकीच्या पारदर्शक तसेच नियमावलीचा भंग झाला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असतानाही सदरील व्यक्‍तीने मतदान प्रक्रीयेचे चित्रीकरण करून ते व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फोटो व्हायरल करणाऱ्यांचे काय? 
आपण केलेले मतदान उमेदवार, मित्र यांना दाखविण्यासाठी सकाळपासूनच मतदारांनी आपापले फोटो व्हायरल केले. यांची माध्यमात जोरदार चर्चाही झाली. मात्र, निवडणुक नियमावलीचा भंग करणाऱ्या व्यक्‍तींवर का कारवाई केली जात नाही? त्यांना पाठीशी  का घातले जात आहे? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. मतदानास सुरवात झाल्यापासून सोशल मिडीयावर उमेदवारांचा सर्रास प्रचार सुरु होता. असे असतानाही सोशल मिडीयात व्हायरल होणाऱ्या गोष्टींवर प्रशासनाचा कुठलाही अंकुश असल्याचे दिसून आले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Files Filed against those who made videos of voting viral on social Media