
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव मात्र पहिल्या यादीत न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पहिली यादी ही अपेक्षित अशीच होती, राजकीत वर्तुळाचे खरे लक्ष लागले आहे ते माढा आणि मावळकडे.
राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्या नव्यांचा मेळ घालत आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे नाव अपेक्षेप्रमाणे जाहीर झाले. बारामतीमधून सुळे यांना सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिली आहे. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट होती. प्रस्थापित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबाबत प्रचंड नाराजी होती, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची विशेषत: शरद पवार यांच्या प्रतिष्ठेची ही जागा राखण्यात सुळे यांना यश मिळाले होते. पुणे जिल्ह्यातील चार जागांपैकी बारामती, शिरूर आणि मावळ या तीन जागा राष्ट्रवादीकडे तर पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीच्या या तीन जागांपैकी केवळ बारामतीची जागा राष्ट्रवादीला राखता आली होती. मात्र सुळे यांचे मताधिक्य कमी करण्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना यश आले होते. राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे दौंड, पुरंदर आणि खडकवासला या तीन विधानसभा मतदारसंघात सुळे यांना जानकर यांच्यापेक्षा कमी मते मिळाली होती.
एकट्या बारामती विधानसभा मतदारसंघात सुळे यानी 1 लाख 42 हजार मते मिळवून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला होता. इंदापूर मतदारसंघात केवळ 22 हजार, भोर मतदारसंघात 16 हजार मतांची आघाडी त्यांना मिळाली होती.
सुळे यांनी हा धोका ओळखून गेल्या पाच वर्षात सातत्याने मतदारसंघाने संपर्क ठेवला होता. खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अर्थात पुण्याच्या सिंहगड रस्ता, धनकवडी आदी भागातील मतदार या भागात जास्त असल्याने आणि महापालिका निवडणुकीत भाजपचे नगरसेवक संख्येने जास्त विजयी झाल्याने यावेळीही राष्ट्रवादीला या भागात गाफील राहता येणार नाही. इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी काँग्रेसने मागितली आहे. विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसला सोडली जाणार की नाही, यावरच इंदापूरमधून सुळे यांना कसा प्रतिसाद मिळतो हे अवलंबून राहणार आहे.
पुरंदर मध्ये त्यांना राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा सामना करावा लागणार आहे. मात्र, या सर्व अडचणी असल्या तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आजही या मतदारसंघावर वर्चस्व आहे. याला कारण असे की, भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघाकडे गेल्या पाच वर्षात लोकसभेच्या दृष्टीने कोणतेही खास प्रयत्न केलेले नाहीत. मंत्रिपद मिळाल्यानंतर जानकर यांनीही या मतदारसंघाकडे पाठ फिरवली. खरेतर राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना जानकर यांना बारामतीचा दुष्काळी पट्टा, दौंड, पुरंदर, इंदापूर आदी भागात चांगले काम करता आले असते. त्यांना मनापासून पाठिंबा दिलेल्या धनगर समाजाच्या मागण्यांकडेही दुर्लक्षच झाले. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देवून या समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला.
बारामतीमधून अद्यापही जानकर उभे राहणार की नाही याबाबत साशंकता आहे. जानकर यांनी भाजपचे कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र जानकर त्यासाठी तयार नसल्याचे समजते. जानकर नसतील तर त्यांना काय पर्याय असेल हेही पक्षाच्यावतीने सांगितले जात नाही. त्यामुळे गेल्या निवडणुकीएवढी भाजप यंदा बारामतीबाबत गंभीर नसल्याचे जाणवते. मात्र, ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो, असे भाजपच्यावतीने सांगण्यात येते. खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना बारामतीची उमेदवारी दिली जावी , असेही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेल्या यादीत अपेक्षेप्रमाणे सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजे यांना उमेदवारी मिळाली आहे. सातारा मतदारसंघात बदल करावा, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा होती, पण उदयनराजे यांच्यापेक्षा चांगला पर्याय नसल्याचे पक्षाच्या लक्षात आल्याने त्यांना राजेंना उमेदवारी देण्याशिवाय पर्याय उरला नाही. उदयनराजे यांनी खास आपल्या 'स्टाइल'ने शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव कायम ठेवला, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळविण्यात यश आले. आता त्यांच्याविरोधात भाजप नरेंद्र पाटील यांना उतरविणार की शिवसेनेचा आणखी कोणी उमेदवार नशीब आजमावणार याकडे लक्ष लागले आहे. हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघाला पाठिंबा देवून खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीत यावे यासाठीचा दबाव वाढविला आहे.
माढा आणि मावळ या संपूर्ण राज्याचे लक्ष असणाऱ्या जागांबाबत मात्र राष्ट्रवादीने आपला निर्णय राखून ठेवला आहे. मावळ मधून पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा पहिल्या यादीत होईल अशी अपेक्षा होती. मात्र स्वतः अजित पवार यांनीच काल मावळबाबत निर्णय झाला नसल्याचे सांगून सर्वांना संभ्रमात पाडले आहे. माढा मतदारसंघात आपण लढणार नसल्याचे शरद पवार यांनी जाहीर केल्याने याठिकाणी विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील की माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख असतील याबाबत उत्सुकता असेल. माढा मधून निवडणूक लढविण्याबाबत पुनर्विचार करावा असे पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांचाही तसा आग्रह आहे. त्यामुळे माढा कोणाला याबाबत उत्सुकता राहणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत जुन्या-नव्यांचा समावेश आहे. पहिली यादी तरी अपेक्षेनुसार असून यात आश्चर्यकारक नावे आलेली नाहीत. त्यामुळे खरे लक्ष असेल ते दुसऱ्या यादीवरच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.