Loksabha 2019 : कविटखेडा गावाचा निवडणुकीवर बहिष्कार कायम

नवनाथ इधाटे
मंगळवार, 23 एप्रिल 2019

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा (जि.औरंगाबाद) या गावाने लोकसभा निवडणुकीवर मंगळवारी (ता.२३)बहिष्कार कायम ठेवले आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत एकाही ग्रामस्थाने निवडणूक मतदान प्रक्रियेत भाग घेतला नसल्याचे दिसून आले.  

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा (जि.औरंगाबाद) या गावाने लोकसभा निवडणुकीवर मंगळवारी (ता.२३)बहिष्कार कायम ठेवले आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत एकाही ग्रामस्थाने निवडणूक मतदान प्रक्रियेत भाग घेतला नसल्याचे दिसून आले.  

फुलंब्री तालुक्यात कविटखेडा हे गाव फुलंब्री-सिल्लोड या राष्ट्रीय महामार्गावर मुख्य रस्त्यापासून दीड किमी अंतरावर आहे. येथील लोकसंख्या 490 असून 198 पुरुष तर 187 महिला मतदार असे एकूण 385 मतदार आहे. या गावातील नागरिकांचा महत्वाचा प्रश्न काही वर्षभरापासून प्रलंबित असल्याने गावकऱ्यांनी एकजूट होऊन लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला ग्रामस्थांनी पाठींबा देत एकही मतदान होणार याची खबरदारी घेतली आहे. 

या गावापासून एक दीड किलोमीटर अंतरावर वडोदबाजार गाव आहे. कविटखेडा व वडोदबाजार या दोन्ही गावाच्या मध्यभागातून गिरीजा नदीचे पात्र आहे. या गिरीजा नदीवरील पूल 2017 मध्ये आलेल्या पुराने अतिवृष्टीत वाहून गेला होता. त्यामुळे रस्ताही खराब झाला. गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने वडोदबाजार येथे शाळेत जातात. शिवाय आठवडी बाजार करण्यासाठी नागरिकांना वडोदबाजार येथे जावे लागते. त्यामुळे कविटखेडा ते वडोद बाजार हा महत्वाचा रस्ता आहे. मात्र राजकीय नेत्यांनी व प्रशासनांनी त्यांच्या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे गावकरी संतापले व त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

प्रशासनाकडून ठोस आश्वासन नाही
कविटखेडा येथील ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकल्यानंतर गटविकास अधिकारी डॉ.अशोक दांडगे यांनी ग्रामस्थांशी मागील आठवड्यात चर्चा करून सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविला होता. त्यांनतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी भेट देऊन ग्रामस्थांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थ आपल्या मुद्द्यावर ठाम असल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार कायम आहे. ज्या विभागाकडे या रस्त्याचे काम आहे, त्या विभागाचे अधिकारी आले नाही ज्यांना काहीएक अधिकार नव्हते असे अधिकारी गावात आले त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kavitakheda village boycott elections