esakal | Loksabha 2019 : सभेचे ‘राज’कारण!
sakal

बोलून बातमी शोधा

Raj-Thackeray

राज ठाकरे यांच्या सभांचा नेमका परिणाम काय होईल, हा आजच्या महाराष्ट्रापुढचा ज्वलंत प्रश्न. त्या सभा, तेथील माहोल, श्रोत्यांच्या प्रतिक्रिया यांतून त्यांच्या परिणामांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न...

Loksabha 2019 : सभेचे ‘राज’कारण!

sakal_logo
By
रवि आमले

निवडणूक वातावरण नावाचा एक प्रकार पूर्वी पत्रकारलोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जात असत. आजही जातात. पण, हल्ली ते वातावरण मात्र गायब असते. ग्रामीण भागात तर त्याचा पत्ताच नसतो. शहरांतही कुठे कुठे लागलेले प्रचारफलक, एखाद्या बाजारपेठेतले उमेदवाराचे प्रचार कार्यालय किंवा सकाळ-संध्याकाळी निघालेली प्रचारफेरी असे काही सोडले, तर येथे निवडणूक आहे हे समजतही नाही.

महाडमधील परिस्थितीही त्याहून वेगळी नव्हती. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या भाषणांची चर्चा आहे, ज्यांची भाषणे लोक आयपीएलच्या सामन्यांप्रमाणे दूरचित्रवाणीवर पाहात आहेत, त्या राज ठाकरे यांचे भाषण आज गावात होणार होते; पण त्याचा पत्ताच नसल्याप्रमाणे महाड शांत होते, नेहमीच्या व्यवहारांत व्यग्र होते. नाही म्हणायला, या सभेचे आवतण देणारे मनसे कार्यकर्त्यांचे फ्लेक्‍स कुठे कुठे झळकत होते.

दगडूशेठ पार्टे कनिष्ठ महाविद्यालयासमोरच्या मैदानात सभा होती. वेळ सायंकाळी सातची. महाडच्या छोट्या रस्त्यांवरून सभास्थान शोधत निघालो तेव्हा ६.३० वाजले होते.

मैदानाजवळ आलो, तशी कार्यकर्त्यांची वाहने दिसू लागली. छोट्या-छोट्या गाड्या, स्कॉर्पिओ, क्वालिस वगैरे. चार-पाचच्या घोळक्‍यांनी लोक चालले होते. मनसेची उपरणी गळ्यात घातलेली तरुण मुलेही अधूनमधून दिसत होती.

सभास्थान. चारी बाजूंनी उंच खांबावर लावलेले मोठमोठे ७३ एलईडी दिवे. समोर उंच सभामंच. त्याचे स्वरूपही ठरलेले. राज ठाकरे यांची ‘ऑप्टिक्‍स’ची खास जाण दाखविणारे. दोन्ही बाजूंना भलेमोठे पडदे. मंचावर मोजक्‍याच दहा-बारा खुर्च्या. मधोमध पुढे आलेला छोटासा रॅम्प. त्यावर खास तयार करून घेतलेले डायस. ते फक्त राज ठाकरे यांच्यासाठी. त्यावरून अन्य कोणी बोलायचे नाही. बाकीच्या वक्‍त्यांसाठी वेगळे डायस. मनसेचा एक स्थानिक कार्यकर्ता त्यावरून सूचना देत होता. पदाधिकाऱ्यांना मंचावर बोलावत होता.

समोर मैदानात, मंचाच्या समोरची, डावीकडची बाजू श्रोत्यांनी भरलेली होती. उजवीकडे मागच्या बाजूला मात्र अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या.
सात-सव्वासात वाजले होते. आता स्थानिक वक्‍त्यांची भाषणे सुरू झाली होती. आधी शिवरायांचे स्मरण. मग ‘राज’वंदना. मग स्थानिक राजकीय उणी-दुणी. केंद्रीय मंत्री अनंत गीते हे येथील युतीचे उमेदवार. एक वक्ता सतत अवजडमंत्री म्हणूनच त्यांची खिल्ली उडवत होता. मनसेच्या राज्यस्तरीय बड्या नेत्यांचे मात्र वेगळेच. त्यांचे लक्ष्यही राज्यस्तरीय होते.

हळूहळू त्या रिकाम्या खुर्च्याही भरू लागल्या होत्या. तरुण, म्हातारे, मध्यमवयीन. मागून पाहिले, तर समोर खुर्च्यावरील अनेकांच्या डोक्‍यांवरची टक्कलं एलईडीच्या उजेडात चमकत होती. पांढऱ्या गांधी टोप्या घातलेले, शर्ट-पायजम्यातले शेतकरी त्यात होतेच. पण, त्या गर्दीत मुस्लिम मुले आणि ज्येष्ठ नागरिकही उठून दिसत होते.

मैदानाबाहेर कडेलाही आता गर्दी झाली होती. खाली खुर्च्यांवर बसून घेण्याचे आवाहन करीत मनसेचे कार्यकर्ते फिरत होते. त्यांच्या स्वरात होती घरच्या कार्यातील यजमानाची विनम्रता. हे लक्षणीयच म्हणायचे.

समोरच्या वक्‍त्याचे भाषण सुरू होते आणि अचानक बाहेर रस्त्यावर फटाक्‍यांचा कडकडाट झाला. मंचावरून ‘शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातील ‘ओ राजे...’ हे गीत घुमू लागले. राज ठाकरे यांचे आगमन झाले होते. ते पाहण्यासाठी मागची सगळी गर्दी उभी राहिली होती. तरुण मुलांना ते सारे कॅमेऱ्यात साठवून घ्यायचे होते. समोरच्या मोठ्या स्क्रीनवर त्यांचे कॅमेरे खिळले होते. मंचावरून, गर्दीतून राज ठाकरे यांचा जयजयकार सुरू होता.

शिवछत्रपतींची महती सांगणारे ते ठेकेदार गाणे हा राज यांची प्रभा वाढविण्यासाठी योजलेले खास तंत्रच. ते राज यांच्या आगमनाला वाजवणे यातून विशिष्ट प्रकारची वातावरणनिर्मिती होत होती. प्रेक्षकांच्या नेणीवेत राज यांची प्रतिमा उंचावत होती.

व्यासपीठावरचे नेहमीचे उपचार आटोपून एक-दोन मिनिटांत राज त्यांच्या डायएसवर आले. खालून ‘राजसाहेब अंगार है...’सारख्या घोषणा दिल्या जात होत्या.

एक मोठा पॉज घेत राज यांनी भाषणाला सुरुवात केली. ‘जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...’ ते ऐकताच सभेतून शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट.

आणि मग नेहमीप्रमाणे राज यांचे भाषण चढत्या क्रमाने रंगू लागले. मुद्दे तेच. मोदी यांच्या वर्तनातील आणि वक्तव्यांतील विसंगतींचा, असत्यांचा पोलखोल करणारे. वेगळेपणा होता तो ध्वनिचित्रफितींचा. तो आता सगळ्याच महाराष्ट्राच्या औत्सुक्‍याचा विषय झालेला आहे. ‘ये, लाव रे तो व्हिडीओ’ हे राज यांचे उद्‌गार तर आता समाजमाध्यमांतून गाजत आहेतच; पण त्यानंतर ते कोणत्या चित्रफिती दाखवून पंतप्रधान मोदी यांच्या चेहऱ्यावरील मुलामा खरवडतील याबद्दलही लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ती कायम ठेवणे हे राज यांच्या प्रचारतंत्राचे खास यश.

बोलता बोलता राज यांनी तो नेहमीचा संवाद म्हटला. ‘लाव रे ते... पाहा...’ बाजूच्या पडद्यावर चित्रफित लागली आणि श्रोत्यांतून शिट्ट्या. कुठून येतात अशा प्रतिक्रिया?

कोणी तरी कोणाचे तरी मुखवटे उतरवत आहेत, कोणी तरी कोणाच्या तरी नाडीला हात घालत आहे, हेच मुळात मोठे नाट्यपूर्ण असते. कलगीतुरा हा लोकांचा आवडता प्रकार असतो तो त्यामुळेच. या गोष्टी मानवी मनातील आदिम हिंस्त्र भावनेला भावणाऱ्या असतात. मोदींची भाषणे गाजतात ती याच कारणाने आणि त्यांच्यावर कोरडे ओढणारी राज यांची भाषणेही लोक मालिका पाहावी तितक्‍या आवडीने पाहतात ती याचमुळे.

राज यांचा करडा आवाज त्या मैदानात दुमदुमत होता. मोदी यांचे सरकार किती खोटारडे आहे. ते कसे हिटलरी प्रोपगंडा करीत आहेत हे सांगतानाच राज यांचा सूर कधी कडक होत होता, कधी संतापत होता. उपहास, वक्रोक्ती, व्याजोक्ती, मधूनच किंचित ग्राम्य विनोद ही राज यांची अस्त्रे. या सगळ्याचा श्रोत्यांच्या मनावर परिणाम होत होता. राज यांनी त्या सभेला केव्हाच खिशात टाकले होते.

ते भाषण सुरू असताना आम्ही न्याहाळत होतो त्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया. त्यांच्या चेहऱ्यांवरचे भाव. मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाच्या दुरवस्थेची चित्रफीत पाहताना एका तरुणाच्या चेहऱ्यावर आश्‍चर्याचे भाव होते. राज मोदींचे वस्त्रहरण करीत असताना एक सदरा-पायजम्यातला शेतकरी मान हलवून हलवून सहमती व्यक्त करीत होता. राज्यातल्या पहिल्या कॅशलेस धसईची खरी कहाणी पडद्यावर लागली आणि आमच्या मागे उभ्या असलेल्या एका तरुणाच्या तोंडून अभावितपणे एक शिवी गेली. ती कोणाला दिलेली शिवी नव्हती. ते त्याचे उद्‌गारचिन्ह होते.

या संपूर्ण सभेत एक बाब प्रकर्षाने जाणवली. राज बोलत असताना सगळे श्रोते त्यांचा शब्द न्‌ शब्द कानात साठवून घेत होते. मन लावून ऐकत होते. राजकीय सभेतील हे चित्र तसे दुर्मीळ. पैसे देऊन गर्दी जमावी म्हणून आणलेल्या लोकांना भाषणात मुळातच रस नसतो. वर्गातील मागच्या बेंचवरील पोरांसारखी त्यांची चुळबूळ सुरू असते. हे या सभेत कुठेही दिसत नव्हते. या दृष्टीने ही सभा यशस्वीच म्हणावी लागेल.

आता मुद्दा उरतो तो राज यांच्या प्रचाराच्या परिणामांचा. राज मोदींबद्दल जे बोलत होते, ते उपस्थित बहुसंख्य श्रोत्यांना नक्कीच पटत होते. ते त्यांच्या प्रतिक्रियांतून, मधूनच दिल्या जाणाऱ्या ‘चौकीदार चोर है’सारख्या घोषणांतून जाणवत होते. पण बाहेर जे राज यांचे लक्षावधी श्रोते आहेत, जे मतदान करणार आहेत, त्यांचे काय?

राज हे वापरत असलेली आयुधे वेगळी आहेत. त्यांत चमत्कृती आहे. ती लोकांना आकर्षित करते आहे. या भाषणांतून ते वारंवारतेचे तंत्रही वापरत आहेत. ते सांगतात, ‘हे मुद्दाम करतो. लोकांच्या डोक्‍यात तो स्क्रू फिट बसला पाहिजे.’ प्रोपगंडातील वारंवारतेच्या तंत्राचा उद्देशच तो स्क्रू टाईट करणे हा असतो. मोदींचा मुखवटा आज गळून पडला आहे तो त्यामुळेच. शिवाय, लोकमानसातील भयभावना चेतवत करण्याचे तंत्रही राज वापरत आहेत. मोदी-शाह यांच्यामुळे देशाची कशी वाट लागेल, ते कसे हुकुमशहा आहेत हे ते सातत्याने सांगत आहेत. हे भय लोकांच्या मतदानाला कितपत प्रभावित करील, हा खरा प्रश्न आहे.

मैदानाबाहेर एक पडदा लावलेला होता. त्यापुढेही बरीच गर्दी होती. मोदी शहिदांच्या नावावर मत मागत असल्याची ध्वनिचित्रफीत सुरू होती. ते पाहून एक नवमतदार त्याच्या मित्राला म्हणाला, ‘च्यायला, काय माणूस आहे!’

ही भावना मतदानावर प्रभाव टाकणार नसेल, तर मग कोणती टाकेल, हा प्रश्नच आहे.

loading image