Loksabha 2019 : पुणे जिल्ह्यातील बहुतांश उमेदवार स्वच्छ!

अनिल सावळे
रविवार, 14 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीतील देशभरातील बहुतांश उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, पुणे जिल्हा त्याला अपवाद ठरत आहे.

पुणे : लोकसभा निवडणुकीतील देशभरातील बहुतांश उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, पुणे जिल्हा त्याला अपवाद ठरत आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार स्वच्छ असल्याचे आशादायी चित्र आहे. परंतु, काही जणांवर राजकीय आंदोलनासह इतर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

निवडणुका आल्या की गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवारांचा मुद्दा ऐरणीवर येतो. नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारांना स्वतःसह कौटुंबिक संपत्ती, दागिने, शेतजमीन, सदनिका आदी मालमत्तेसोबतच दाखल गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात देणे बंधनकारक आहे. पूर्वी काही नेते वर्चस्वासाठी गुन्हेगारांचा वापर करीत असत. मात्र, सध्या काही गुन्हेगारच निवडणूक लढवीत असल्याचे चित्र निवडणुकांमध्ये दिसून येत आहे. काही राजकीय नेत्यांकडून खुलेआमपणे साम-दाम-दंड-भेद याची भाषा केली जात आहे. दरम्यान, राजकारणातील गुन्हेगारी थांबविण्यासाठी राजकीय पक्षांनीच गुन्हेगारांना उमेदवारी देऊ नये, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. 

जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत. त्यानुसार काही प्रमुख उमेदवारांवरील दाखल गुन्ह्यांची माहिती ः 

पुणे लोकसभा मतदारसंघ ः 

मोहन जोशी (कॉंग्रेस) ः राजकीय आंदोलन, जमावबंदी आदेश उल्लंघन (भोसरी पोलिस ठाणे). 
गिरीश बापट (भाजप) ः राजकीय आंदोलन, जमावबंदी आदेश उल्लंघन (विश्रामबाग पोलिस ठाणे). 
अनिल जाधव (वंचित बहुजन आघाडी) ः जमिनीच्या वादातून बेकायदेशीर जमाव जमविणे (वाकड पोलिस ठाणे). 

बारामती लोकसभा मतदारसंघ ः 

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ः कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही. 
कांचन कुल (भाजप) ः कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही. 
नवनाथ पडळकर (वंचित बहुजन आघाडी) ः कौटुंबिक वाद, जमावबंदीचे उल्लंघन (बारामती पोलिस ठाणे). 

शिरूर लोकसभा मतदारसंघ ः 

अमोल कोल्हे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ः कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही. 
शिवाजी आढळराव (शिवसेना) ः बैलगाडा शर्यतीवर बंदीविरोधात आंदोलन (चाकण पोलिस ठाणे) आणि बदनामी केल्याप्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा. 
राहुल ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) ः जमीन वाद फसवणूक (लोणावळा पोलिस ठाणे). 

मावळ लोकसभा मतदारसंघ ः 

पार्थ पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ः कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही. 
श्रीरंग बारणे (शिवसेना) ः बैलगाडा शर्यतीवर बंदीविरोधात आंदोलन, जमावबंदी उल्लंघन (चाकण पोलिस ठाणे). 
राजाराम पाटील (वंचित बहुजन आघाडी) ः कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many of Candidate of Pune District have Clean Nature