Loksabha 2019 : मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी मुकेश अंबानींचा व्हिडिओ

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 एप्रिल 2019

- मुकेश अंबानी यांच्यासह उदय कोटक यांचाही मिलिंद देवरा यांना पाठिंबा.

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता देवरा यांच्या प्रचारासाठी देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. याबाबतचे ट्विट करत त्यांनी देवरा यांना पाठिंबा दर्शविला आहे.

मुकेश अंबानी यांच्यासह कोटक महिंद्रा ग्रुपचे मालक उदय कोटक यांनीही आपला पाठिंबा देवरा यांना दर्शविला आहे. अंबानी आणि कोटक यांच्यासह इतर काही दुकानदार आणि छोट्या व्यापाऱ्यांनीही आपले समर्थन दिले आहे. याबाबतचा व्हिडिओ देवरा यांनी ट्विट केला असून, यामध्ये सांगितले, की ''दक्षिण मुंबईचा अर्थ म्हणजे उद्योग. यासोबतच जेव्हा मी विजयी होईन तेव्हा मी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेन. तरुणांना रोजगार देणं ही माझी प्राथमिकता आहे''.

तसेच मुकेश अंबानी यांनी ट्विटमध्ये सांगितले, की ''मिलिंद इज द मॅन फॉर साऊथ मुंबई (दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा योग्य उमेदवार) आहेत. मिलिंद यांना विविध मुद्यांवर विशेष माहिती आहे. ते तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देतील, असा मला विश्वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambani Supporting to Congress Candidate Milind Deora