Loksabha 2019 : 'मोदी, अमित शहा अडवानींचे नालायक शिष्य'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 एप्रिल 2019

- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह "गुरू अडवानी यांचे नालायक शिष्य'

नवी दिल्ली : भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या ब्लॉगच्या निमित्ताने कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर हल्ला चढविताना दोन्ही नेत्यांची "गुरू अडवानी यांचे नालायक शिष्य' अशा शेलक्‍या शब्दांत खिल्ली उडवली आहे. तसेच गुरू अडवानींनी सांगितलेल्या राष्ट्रद्रोहाच्या व्याख्येचा दोन्ही नालायक शिष्यांनी पुनर्विचार करावा आणि आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही लगावला आहे. 

कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानींच्या ब्लॉगवर पक्षाची प्रतिक्रिया देताना मोदी-शाह जोडगोळीला लक्ष्य केले. ते म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे गुरू असलेले वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी दोघांना जे शाब्दिक फटकारे दिले आहेत. त्यातून मोदींचे अहंकारवादी वर्तन आणि चारित्र्य उघड झाले आहे. असहमत असणाऱ्यांना राष्ट्रद्रोही मानणे हे अयोग्य आणि लोकशाही विरोधी आहे, असे अडवानींनी म्हटले आहे; पण त्यांच्या दोन्ही चेल्यांना थोडीही लाज वाटली नाही. त्यांनी गुरूंच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. भारतीय संस्कृतीत गुरूंचा अनादर करणाऱ्यांना "नालायक शिष्य' म्हणतात. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही नालायक शिष्य या व्याख्येत येतात.'' 

"राजकीय संवादाचा स्तर खालच्या पातळीवर नेणे हा त्यांच्या शैलीचा आणि चारित्र्याचा हिस्सा आहे. मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अशा वेळी अपयश लपविण्यासाठी ते सैन्यदलांच्या मागे दडत आहेत,'' असाही हल्ला रणदीप सुरजेवाला यांनी चढवला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi Amit Shah are Disciple of LK Advani Criticizes Congress