Loksabha 2019 : 'महामिलावटी'ने केला संपत्तीचा गुणाकार : पंतप्रधान

पीटीआय
Monday, 6 May 2019

"महामिलावटी'त सहभागी असलेल्या लोकांनी त्यांच्या सत्ताकाळात सत्तेचा वापर केवळ स्वत:च्या संपत्तीचा गुणाकार करण्यासाठी केला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर आजही हल्लाबोल केला. 

भादोही (उत्तर प्रदेश) : "महामिलावटी'त सहभागी असलेल्या लोकांनी त्यांच्या सत्ताकाळात सत्तेचा वापर केवळ स्वत:च्या संपत्तीचा गुणाकार करण्यासाठी केला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर आजही हल्लाबोल केला. 

येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सप-बसप-रालोद आघाडीला लक्ष्य केले. "महामिलावटीतील हे लोक अनेक गैरव्यवहारांमध्ये अडकले असून, त्यांनी कायम भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले. भाजपसाठी मात्र सत्ता हे जनसेवेचे माध्यम आहे. विरोधक सत्तेत असताना त्यांनी रुग्णवाहिका गैरव्यवहार आणि ग्रामीण आरोग्य योजनांमध्येही गैरव्यवहार केला. आम्ही जनतेला आयुष्मान भारतसारखी योजना आणि जन औषधी स्टोअर्सची सुविधा दिली. विरोधक सत्तेत असताना त्यांनी विद्युत पुरवठाही धर्म आणि जातीच्या आधारावर केला,' असे आरोप मोदींनी या वेळी केले.

मोदींनी आणखीही काही उदाहरणे देत विरोधकांचा सत्ताकाळ आणि सध्याच्या एनडीए सरकारचा सत्ताकाळ यांची तुलना केली. "तुमच्या या चौकीदारामुळे विरोधकांच्या अनेक कुटिल योजना फसल्या आहेत. त्यामुळेच ते त्रस्त असून माझ्याविरोधात कट करत आहेत. मात्र माझ्या पाठीमागे तुमचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे हे महामिलावटी लोक काहीही करू शकत नाहीत,' असेही मोदी म्हणाले. 

"राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर 1' 

उत्तर प्रदेशमधील आणखी एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचाही उल्लेख केला. "तुमच्या स्तुतिपाठकांनी राजीव यांना कायम मि. क्‍लीन मानले. मात्र, भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणूनच त्यांच्या आयुष्याची अखेर झाली,' असे मोदी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi Criticizes on Congress and Alliance