Loksabha 2019 : शेरोशायरी करत मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र 

पी. बी. सिंह
रविवार, 5 मे 2019

"न मैं गिरा और न मेरी उम्मीदों के मीनार गिरे, पर कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे,' अशी शेरोशायरी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

प्रतापगड (उत्तर प्रदेश) : "न मैं गिरा और न मेरी उम्मीदों के मीनार गिरे, पर कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे,' अशी शेरोशायरी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. मात्र बसप आणि या पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर त्यांनी सौम्य शब्दांत टीका केली. 

प्रतापगडमध्ये झालेल्या सभेत बोलताना मोदींनी, देशाला भ्रष्टाचार, अस्थिरता, जातियवाद, घराणेशाही आणि कुशासन या पाच बाबींपासून धोका असल्याचे प्रतिपादन केले. लोकसभेसाठी आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यांत उत्तर प्रदेशातील मतदारांनी निकाल काय येतील याचा निर्णय केला आहे असे सांगून मोदी म्हणाले, की पाचव्या टप्प्यातही मतादारांनी असाच उत्साह दाखविला, तर महामिलावटी लोकांना मैदान सोडावे लागेल. सप-बसप आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, की आघाडीच्या नावाखाली सपने मायावतींच्या पक्षाकडून फायदा करून घेतला. मात्र सप-कॉंग्रेसने काय खेळी केली आहे याची मायावतींना जाणीव झाली असून, त्या आता कॉंग्रेसवर उघड टीका करत आहेत. 

कॉंग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, ""माझी प्रतिमा मलिन करणे हे कॉंग्रेसचे एकमेव लक्ष्य आहे. पण मी सोन्याचा चमचा घेऊन आणि मोठ्या घराण्यात जन्मलेलो नाही. भारत मातेच्या मातीत मी वाढलो आहे. गेली पन्नास वर्षे मी फक्त देशासाठी जगतो आहे. कॉंग्रेसचे नामदार ट्रस्टच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करतात. काराखान्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तेथे नोटांची शेती करतात.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi Ctiticizes Opposition Party