Loksabha 2019 : राष्ट्रवादीची घराणेशाहीचीच 'री'; पार्थ पवार, समीर भुजबळ दुसऱ्या यादीत 

NCP also pursuing nepotism for elections Parth Pawar Sameer Bhujbal are in second list of loksabha election
NCP also pursuing nepotism for elections Parth Pawar Sameer Bhujbal are in second list of loksabha election

सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे.

एकाबाजूला पार्थ यांची उमेदवारी तर दुसरीकडे सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागलेल्या शिरूर मतदारसंघातून अभिनेते आणि 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील संभाजी महाराज यांची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन पक्षाने नवा प्रयोग केला आहे. पार्थ आणि डॉ. कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे या तीन उमेदवारांची घोषणा करून राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्यात उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. नाशिकमध्ये समीर भुजबळ यांना तर दिंडोरीत धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर करून पक्षाने जातीय समीकरणांचीही सांगड घातली आहे. विजयी होणारा उमेदवार या निकषाखाली पक्षाने घराणेशाहीलाच महत्त्व दिले आहे. 

पार्थ पवार यांच्या मावळ मधील उमेदवारीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली होती. पवार कुटुंबीयांचा निर्णय होऊन पार्थ यांची उमेदवारी निश्‍चित करण्यात आल्याचे पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर पवार यांचे दुसरे नातू रोहित राजेंद्र पवार यांनी शरद पवार यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे साकडे घातले होते. राष्ट्रवादीच्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत पार्थ यांचे नाव नव्हते, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या उमेदवारीवरून चर्चा सुरू झाली. मात्र पक्षाच्या वतीने आज तातडीने दुसरी यादी प्रसिद्ध करून त्यात पार्थ यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे पार्थ यांच्या नावावरून सुरू असणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा आणि अजित पवार यांचा खास प्रभाव असणाऱ्या पिंपरी-चिंचवडचा समावेश असणाऱ्या मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण हे तीन तर मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे पुणे जिल्ह्यातील तीन असे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. सलग दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चितपट करून शिवसेनेने मावळ आपल्या ताब्यात ठेवला होता. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शेकापमध्ये गेलेले लक्ष्मण जगताप यांच्यात लढत होऊन बारणे विजयी झाले होते. यावेळी जगताप हे भाजप मध्ये आहेत. बारणे पुन्हा उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पार्थ पवार आणि बारणे अशी थेट लढत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

यंदाच्या निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलली आहेत. शेकाप काँग्रेस आघाडीत सामील झाला असून, शेकापचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पार्थ यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे वजन वाढले आहे. अजित पवार यांचेच चिरंजीव निवडणूक लढवीत असल्याने दादा या मतदारसंघात पूर्ण ताकद लावतील याविषयी शंका नाही. आमदार लक्ष्मण जगताप सध्या भाजप मध्ये असले तरी त्यांचे आणि पार्थ यांचे घरगुती संबंध आहेत. अजित पवार यांनी सध्या भाजपमध्ये असलेल्या आझमभाई पानसरे यांचीही नुकतीच भेट घेऊन दोघांमधील कटुता कमी केली आहे. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर अजित पवार यांची अनेक वर्षे पकड होती. या ठिकाणचे अनेक नेते पवार यांनी विविध पदे आणि ताकद देऊन मोठे केलेले आहेत. त्यामुळे पार्थ यांच्यासाठी ते आपल्या सर्व जुन्या सहकाऱ्यांना आवाहन करतील यात शंका नाही. 2014 च्या निवडणुकीत शेकापला 3 लाख 54 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीला 1 लाख 82 हजार मते मिळाली होती. बारणे यांनी 5 लाख 12 हजार मते मिळवून विजय मिळवला होता. त्या मतांपर्यंत पार्थ यांना पोचण्यास नवी समीकरणे उपयुक्त ठरतील काय, याबाबत उत्सुकता आहे. 

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन धक्कातंत्राचा वापर केला आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाली आहेत. चौथ्यांदा ते राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या पंधरा वर्षात स्वत:चा सक्षम उमेदवार देता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. यावेळीही विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्यासह पक्षाच्या इतर मातब्बरांनीही शिरूर मधून काढता पाय घेतला. त्यामुळे अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरावे लागले. कोल्हे यांना मालिकेमुळे मिळालेली लोकप्रियता मतदारपेटीपर्यंत मतदारांना घेऊन जाणार काय, याबाबत उत्सुकता आहे. अजित पवार मावळ सोबत शिरूर मध्ये किती वेळ देणार याकडेही जाणकारांचे लक्ष राहील. या मतदारसंघात आजही शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्याला छेद देण्यात राष्ट्रवादीला यश मिळणार काय, हे लवकरच स्पष्ट होईल. 

राष्ट्रवादी काँग्रेसने घराणेशाहीची परंपरा या निवडणुकीतही कायम ठेवली आहे. पार्थ पवार, समीर भुजबळ यांच्या नावांमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी देणारच नाही काय, असा प्रश्‍नही कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com