Loksabha 2019 : भाजप नव्हे, 'एनडीए'ला बहुमत : राम माधव

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मे 2019

लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडी म्हणजे "एनडीए'ला बहुमत मिळेल, याचा पुनरुच्चार करून पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्वपक्षीय नेतृत्वाच्या वारेमाप स्वप्नफुग्यांना टाचणी लावली.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडी म्हणजे "एनडीए'ला बहुमत मिळेल, याचा पुनरुच्चार करून पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्वपक्षीय नेतृत्वाच्या वारेमाप स्वप्नफुग्यांना टाचणी लावली. अर्थात, कालच्या त्यांच्या सत्यकथनानंतर काही घडामोडी झाल्याची शक्‍यता लक्षात घेता आज राम माधव यांनी, भाजपही 2014 चेच यश पुन्हा मिळवेल, अशी पुस्ती जोडली. 

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उत्तर प्रदेशातील जागांची 73 वरून 74 अशी बेरीज होऊ शकते, असे सांगताना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी यंदा अमेठी जिंकल्यात जमा असल्याचा आत्मविश्‍वास पुन्हा व्यक्त केला. याच हिशेबाने भाजप 300 हून जास्त जागा मिळवेल, असाही दावा पक्षनेते सातत्याने करीत आहेत. माधव यांनी मात्र बहुमत कोणाला, या प्रश्‍नावर भाजपला "आघाडी' हा शब्द जोडला. त्यानंतर याची चर्चा सुरू झाल्यावर माधव यांनी आज भाजप 2014 प्रमाणेच यश मिळवेल, अशी दुरुस्ती केली. 

मी नरेंद्र मोदींना पंतप्रधान मानतच नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हणणे अतिशय दुर्दैवी आहे, असे सांगून राम माधव म्हणाले की, पायाखालची जमीन सरकणाऱ्या व्यक्तीकडूनच असे टोकाचे विचार व्यक्त होतात. त्यांच्या बोलण्यात काही दम नाही. पश्‍चिम बंगालमध्ये इतका हिंसाचार आहे, की निवडणूक आयोगाला मतदान केंद्रांवर निमलष्करी जवानांना तैनात करण्याची वेळ आली. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या ट्‌विटवर प्रतिक्रिया देणारे कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यावर टीका करताना राम माधव म्हणाले की, थरूर यांचे शेजारच्या देशांतील नेत्यांबरोबरचे प्रेम व स्वदेशीय नेत्यांबद्दलचा द्वेष सर्वांना दीर्घकाळापासून माहिती आहे. 

आमच्याकडे सशक्त "किंग' 

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निवडणुकीनंतर आपला पक्ष "किंगमेकर' बनेल, असे विधान केले आहे. त्यावर राम माधव म्हणाले की, आमच्याकडे एक सशक्त "किंग' आधीपासून आहे, त्यामुले भाजपला व देशाला नव्याने "किंगमेकर' शोधण्याची वेळच येणार नाही. "किंगमेकर' बनणे, ही केसीआरच काय, विरोधकांपैकी अनेकांची सुप्त महत्त्वाकांक्षा असल्याचाही टोला राम माधव यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDA Will get Full Majority in Loksabha Election says Ram Madhav