Loksabha 2019 : 'ईव्हीएम'विरोधात विरोधकांची एकजूट

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 एप्रिल 2019

"ईव्हीएम'बद्दल राजकीय पक्ष आणि मतदारांच्याही मनात शंका आहेत. निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली आहे. आयोगाचे वर्तन निष्पक्ष असावे; परंतु ते तसे नाही. म्हणूनच मतमोजणी दरम्यान 50 टक्के मतांची पडताळणी व्हीव्हीपॅटद्वारे व्हावी हा आग्रह आहे. 

- चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश 

नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत (ईव्हीएम) जोडलेल्या व्हीव्हीपॅट यंत्राचा प्रतिसाद कालावधी आणि येणारी पावती यामध्ये तफावत असून, "ईव्हीएम'मध्ये फेरफार झाली असल्याचा आरोप विरोधकांनी आज केला. तसेच, मतमोजणीवेळी किमान 50 टक्के मतदान पावत्यांची पडताळणी ईव्हीएमशी व्हावी या मागणीसाठी पुन्हा न्यायालयात जाण्याची घोषणाही केली. 

इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (ईव्हीएम) गोंधळावरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा झाल्यानंतर दिल्लीत आज कॉंग्रेस, आम आदमी पक्ष, तेलुगू देसम यांच्यासह सहा प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत "ईव्हीएम'ला लक्ष्य केले आणि मतपत्रिकेद्वारेच मतदान घेण्याची मागणी केली. "लोकशाही बचाओ' या नावाने विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉंग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल आदी उपस्थित होते. "ईव्हीएम'मधील गडबड गोंधळ थांबविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्याची नाराजीदेखील या वेळी व्यक्त केली. 
21 विरोधी पक्षांची बाजू मांडण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा कॉंग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी या वेळी केली. "निवडणूक प्रक्रियेवर सातत्याने प्रश्‍न उपस्थित होत असताना आयोगाकडून मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

एखाद्या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबल्यानंतर मत दुसरीकडे जाण्याचे प्रकार पहिल्या टप्प्यात आढळले. "ईव्हीएम'मध्ये मतदानासाठी बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅटमधून आलेली पावती केवळ तीन सेकंदांसाठी दिसली. हा वेळ वाढवून सात सेकंद केला जावा. निवडणुकीच्या विश्‍वासार्हतेसाठीच 50 टक्के मतांची पडताळणी व्हीव्हीपॅटद्वारे करण्याची आमची मागणी आहे, असे सिंघवी यांनी पत्रकारांना सांगितले.

याआधी हाताने मतपत्रिकांची मोजणी होत असतानाही पाच दिवस लागत नव्हते, असे म्हणताना सिंघवी यांनी या गोंधळावरून देशव्यापी आंदोलन करण्याचाही इशारा दिला. तर, कपिल सिब्बल यांनी ईव्हीएम 24 तासांसाठी ताब्यात द्या, त्यातील गडबड दाखवून देतो, असे आव्हान दिले. 

"भाजपलाच मत कसे मिळते?' 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही "ईव्हीएम'च्या निमित्ताने सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. "देशातील मतदारांना ईव्हीएमवर आजिबात विश्‍वास उरलेला नाही. लोकशाहीवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. केवळ एक पक्ष वगळता सर्व पक्ष मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी करत आहेत.

भाजपला याचा फायदा मिळतो म्हणून त्यांच्याकडून विरोध केला जात आहे. खराब ईव्हीएममधून भाजलाच मत कसे मिळते याची चौकशी का केली जात नाही,' असा सवाल केजरीवाल यांनी केला. भाजपला फायदा व्हावा यासाठीच ईव्हीएममध्ये बिघाड केला जात आहे, असाही आरोप केजरीवाल यांनी या वेळी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition Party Come Together against EVM