Loksabha 2019 : विरोधकांना स्पष्ट बहुमत मिळेल : चंद्राबाबू

पीटीआय
शनिवार, 11 मे 2019

जनता भाजपला कंटाळली असून, अकार्यक्षम मोदी सरकार त्यांना नकोसे झाले आहे, हे पहिल्या पाच टप्प्यांत झालेल्या मतदानानंतर दिसून येत आहे. 

- चंद्राबाबू नायडू, तेलुगू देसमचे प्रमुख 

कोलकाता : सर्वच विरोधी पक्षांचे नेते नरेंद्र मोदींपेक्षा चांगले आहेत. त्यामुळे निकालानंतर एकत्र बसून कोण पंतप्रधान होईल, याचा एकमताने निर्णय घेतला जाईल, असे सांगत तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी विरोधकांना निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळण्याचा विश्‍वास व्यक्त केला. 

चंद्राबाबू नायडू यांनी "पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत निवडणुकीबाबतचे त्यांचे भाकीत व्यक्त केले. "मोदी सरकारबद्दल जनतेमध्ये नाराजी असल्याने त्याचा भाजपविरोधकांना फायदा होऊन त्यांना सत्ता मिळेल. भाजपच्या विरोधातील सर्वच पक्ष शक्तिमान असून, त्यांचे नेतेही सामर्थ्यशाली आहेत. ते मोदींहून अधिक चांगले आहेत. त्यामुळे विरोधकांपैकी पंतप्रधानपदासाठी कोण सर्वोत्तम आहे, याचा निर्णय निकालानंतर सार्वमताने केला जाईल,' असे नायडू म्हणाले. नायडू यांनी आपण स्वत: मात्र पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट करत मी केवळ समन्वयक असल्याचे सांगितले. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनता अस्पष्ट कौल देणार नाही. कारण, सर्वच विरोधी पक्षांच्या बाजूने जनता असून भाजप ही निवडणूक हरणार असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा नायडू यांनी मुलाखतीदरम्यान केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition will get a clear majority says Chandrababu Naidu