Loksabha 2019: मुख्यमंत्री महोदय आणखी किती संयम बघणार अकोलेकरांचा? 

मनोज भिवगडे
गुरुवार, 11 एप्रिल 2019

अकोला - सलग तीन वेळा लोकसभेत खासदार, विधानसभेत पाच पैकी चार आमदार, विधान परिषदेत युतीचे तीन आमदार अन् महापालिकेत ८० पैकी ४८ एकट्या भाजपचे नगरसेवक...आणखी किती यश अकोलेकरांनी भाजपला द्यावे. त्याबदल्यात अकोलेकरांना पाच वर्षांत काय मिळाले? अर्धवट रस्ते, महापालिकेची भरमसाठ मालमत्ता करवाढ, अपूर्ण सिंचन प्रकल्प, अर्धवट महामार्ग, विमानतळाचा प्रश्‍न अधांतरी, एमआयडीसीच्या समस्या कायम, उड्डान पुलाचे काम अद्याप सुरू नाही, फसवी कर्जमाफी, कायमची पाणीटंचाई, अपूर्ण भूमिगत गटार योजना, ठप्प पडलेला बांधकाम व्यवसाय, रखडलेला अकोला-खंडवा रेल्वे मार्ग, ८६ हजार बेरोजगार...

अकोला - सलग तीन वेळा लोकसभेत खासदार, विधानसभेत पाच पैकी चार आमदार, विधान परिषदेत युतीचे तीन आमदार अन् महापालिकेत ८० पैकी ४८ एकट्या भाजपचे नगरसेवक...आणखी किती यश अकोलेकरांनी भाजपला द्यावे. त्याबदल्यात अकोलेकरांना पाच वर्षांत काय मिळाले? अर्धवट रस्ते, महापालिकेची भरमसाठ मालमत्ता करवाढ, अपूर्ण सिंचन प्रकल्प, अर्धवट महामार्ग, विमानतळाचा प्रश्‍न अधांतरी, एमआयडीसीच्या समस्या कायम, उड्डान पुलाचे काम अद्याप सुरू नाही, फसवी कर्जमाफी, कायमची पाणीटंचाई, अपूर्ण भूमिगत गटार योजना, ठप्प पडलेला बांधकाम व्यवसाय, रखडलेला अकोला-खंडवा रेल्वे मार्ग, ८६ हजार बेरोजगार... मुख्यमंत्री महोदय अकोलेकरांचा आणखी किती संयम बघणार आहात? 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाच वर्षांपूर्वी अकोलेकरांना भाजपच्या नेत्यांनी भक्कमपणे पाठीशी उभे राहण्याचे आश्‍वासन मागितले होते. त्याबदल्यात अकोलेकरांना मिळाले भरभरून विकासाचे आश्‍वासन होते. अकोलेकरांनी लोकसभा निवडणुकीत खासदार संजय धोत्रे यांना सव्वा दोन लाख मतांनी विजयी केले. पुन्हा विधानसभेत ‘नरेंद्र नंतर देवेंद्र’साठी अकोलेकरांना आश्‍वासन मागण्यात आले. ते आश्‍वासन पाच पैकी चार आमदार विधानसभेत पाठवून अकोलेकरांनी पूर्ण केले. पुन्हा महापालिका निवडणुकीत अकोलेकरांना भक्कम पाठिंबा देण्याचे आश्‍वासन मागण्यात आले. अकोलेकरांनी हे आश्‍वासनही ८० पैकी ४८ नगरसेवक निवडून देत पूर्ण केले. अकोलेकरांनी तीनवेळा त्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली. मात्र, मुख्यमंत्री महोदय तुम्ही प्रत्येकवेळी अकोल्यात येवून दिलेल्या आश्‍वासनातील एकाही आश्‍वासनाची आजापर्यंत पूर्तता केली नाही. 

लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर २०१५ मध्ये नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी अकोल्यात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन केले. तेव्हाच अशोक वाटिका ते रेल्वे स्थानक उड्डान पुलाचे भूमिपूजनही केले. ही दोन्ही कामे आज अर्धवट आहेत. अकोला-अकोट मार्गाने आजही नागरिक धुळ खात ये-जा करीत आहेत. तुम्ही २०१७ मध्ये पुन्हा नितीन गडकरी यांच्यासोबत मुख्यमंत्री अकोला जिल्ह्यात आले. ‘बळीराजा संजीवनी’ योजनेतून जिल्ह्यातील सात प्रमुख सिंचन प्रकल्पाचे अर्धवट कामे पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. निधी देण्याची घोषणा केली, पैसे कुठे आहेत? सिंचन प्रकल्पांच्या कामाचे काय झाले? विमानतळ विस्तारिकरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यांची जागा दिली. आता शासनाला विस्तारिकरणासाठी आणखी काय हवे आहे? अकोला शहरासह जिल्ह्यात कायमची पाणीटंचाई. ही पाणीटंचाई दूर होऊन दररोज पाणी मिळेल का? अकोलेकरांना पडलेल्या या प्रश्‍नांची उत्तर मुख्यमंत्री महोदय लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तरी मिळतील का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people in akola are not happy on current government