Loksabha 2019 : वंशवाद की होगी हार.. फिर एक बार मोदी सरकार! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

गेल्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये सतत जनता भीतीच्या सावटाखाली होती. कधी रेल्वेत स्फोट, कधी रस्त्यावर स्फोट.. या स्फोटात कोण जीव गमावत होतं? शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक.. म्हणजेच सर्वसामान्य जनता!

नगर : 'याआधीचे सरकार जगासमोर आणि पाकिस्तानसमोर कमकुवत भासत होते. आता भारताने जगासमोर झुकणे बंद केले आहे', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) 'फिर एक बार मोदी सरकार'ची जोरदार घोषणा दिली. 'येत्या 23 मेनंतर देशामध्ये पुन्हा मोदी सरकारच येणार आहे', असा विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त केला. नगरमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान खासदार दिलीप गांधीही उपस्थित होते. 

मोदी म्हणाले, "गेल्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये सतत जनता भीतीच्या सावटाखाली होती. कधी रेल्वेत स्फोट, कधी रस्त्यावर स्फोट.. या स्फोटात कोण जीव गमावत होतं? शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक.. म्हणजेच सर्वसामान्य जनता! गेल्या चार वर्षांत तुम्ही 'चौकीदारा'ची सत्ता पाहिली आहे. आता ते बॉम्बस्फोट कुठे गेले? आता तुमची एक चूकही खूप महागात पडेल, अशी भीती आता त्या दहशतवाद्यांच्या मनात बसली आहे. यापूर्वीचे सरकार पाकिस्तान आणि जगासमोर कमकुवत भासत होते. आमचे जवान बदला घेण्याची मागणी करत होते; पण सरकार मूग गिळून गप्प असे. पण आम्ही पाकिस्तानच्या घरात घुसून उत्तर देण्याची मुभा लष्कराला दिली आहे. आता भारताने जगासमोर झुकणे बंद केले आहे. तुम्ही या मजबूत भारताच्या भूमिकेवर समाधानी आहात का? तुम्ही समाधानी आहात; पण ज्यांनी देशाची भावना समजून घेणेच सोडून दिले आहे, त्यांना हे कसे समजणार?'' 

गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आजच्याच दिवशी नगरमध्ये मोदी यांची सभा झाली होती. त्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले, "काही वर्षांपूर्वी मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो, तेव्हा तुम्ही आमच्यावर प्रचंड प्रेम केलं. त्याहीपेक्षा अधिक प्रेम मला यावेळी जाणवत आहे. पाच वर्षांपूर्वी मी आजच्याच दिवशी इथे सभा घेतली होती. पण त्यावेळी आजच्यापेक्षा निम्मे लोकही नव्हते. पण आज असं काय झालंय, की त्या सभेपेक्षा दुप्पट गर्दी झाली आहे. तुमच्या या विश्‍वासाला मी वंदन करतो. तुम्ही इतक्‍या कडाक्‍याच्या उन्हात इथे येऊन माझ्यावरील ऋण अजून वाढविले आहे.'' 

शरदराव, तुम्हाला झोप कशी काय लागते? 
'काँग्रेसने देशासमोर अनेक समस्या निर्माण केल्या. जम्मू-काश्‍मीरची समस्या हे काँग्रेसचेच पाप आहे. आता देशात दोन पंतप्रधान असण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. काँग्रेसचे ठीक आहे; पण शरदराव पवार यांना काय झाले आहे? तुम्ही देशाच्या नावाखालीच काँग्रेस पक्षातून बाहेर पडला होता. तुमच्या पक्षाच्या नावातही 'राष्ट्रवादी' आहे. मग आता देशात दोन पंतप्रधान करण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि शरद पवार गप्प आहेत. या चर्चा पवार यांना मान्य आहेत का? देशाचे असे विभाजन करण्याची मागणी होत असताना पवार यांना झोप कशी काय लागते?', असा प्रश्‍न मोदी यांनी उपस्थित केला. 

मोदी म्हणाले.. 
- याच भागाने देशाला 'सबका साथ'चे अमूल्य संस्कार दिले आहेत. 
- गेल्या पाच वर्षांत जनभागीदारीने चालणारे एक मजबूत, भक्कम निर्णय घेणारे सरकार स्थापन झाले आहे. त्यापूर्वीच्या दहा वर्षांमध्ये देशात काय सुरु होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. 
- आज जगात भारत महाशक्ती आहे, याचे कारण म्हणजे गेल्या पाच वर्षांत तुम्ही देशाला दिलेले स्थिर आणि भक्कम सरकार! 
- देशात इमानदार चौकीदार हवे आहेत की भ्रष्टाचारी नामदार हवे आहेत? भारताचे हिरो हवे आहेत की पाकिस्तानचे सहानुभुतीदार! काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'महामिलावट'चा खोटारडेपणा आणि दुसरीकडे 'महायुती'ची विकासाची दृष्टी.. यातून तुम्ही निवडायचे आहे. 
- जम्मू-काश्‍मीरला भारतापासून वेगळे करू, अशी भाषा करणाऱ्यांसोबत काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष उभे आहेत. जम्मू-काश्‍मीरची समस्या हे काँग्रेसचेच पाप आहे. 
- जम्मू-काश्‍मीरमधून लष्कराला हटविण्याची मागणी काँग्रेस करत आहे. मी महाराष्ट्र आणि देशातील नवमतदारांना विचारू इच्छितो, देशाच्या सुरक्षेवर आधीच्या सरकारांची कमकुवत भूमिका तुम्हाला मंजूर आहे? 
- देश सुरक्षित असेल, तेव्हाच प्रत्येक नागरिकाचे हित जपले जाईल आणि विकास होऊ शकतो. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील लाखो गरीबांना स्वत:चे हक्काचे पक्के घर मिळाले, घराघरांत शौचालये झाली, वीज पोचली.. चूल पेटविण्यासाठीही वाट पाहावी लागत असे, अशा महिलांना आता गॅसही मिळू लागला आहे. याचे एकमेव कारण म्हणजे जनतेने इमानदार सरकार निवडले आहे.

Web Title: PM Narendra Modi addresses public rally in Nagar