Loksabha 2019 : गृहमंत्रालयाकडून राहुल गांधींना नोटीस 

वृत्तसंस्था
Tuesday, 30 April 2019

राहुल गांधी हे जन्मजात व अस्सल भारतीय आहेत हे साऱ्या हिंदुस्तानला माहिती आहे. भारतीयांसमोरच त्यांचा जन्म झाला, त्यांच्यासमोरच ते वाढले. "हा काय बकवास आहे ? 

- प्रियांका गांधी वद्रा, सरचिटणीस कॉंग्रेस 

नवी दिल्ली : भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी उकरून काढलेल्या व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावरून केंद्रातील मोदी सरकारने गांधी यांना आज "पंधरवड्यात उत्तर द्या,' अशी नोटीस बजावल्याने ऐन रणधुमाळीत वातावरण तापले आहे. याबाबतचा वाद वाढल्यावर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ही नेहमीची प्रक्रिया आहे व त्यात विशेष काही नाही व याचा निवडणुकीशी काही एक संबंधही नाही, असा युक्तिवाद केला. 

राहुल गांधी हे ब्रिटनचेही नागरिक आहेत असा स्वामी यांचा दावा आहे. त्यापलीकडेही राहुल व लंडन याबद्दलची बरीच "रंजक' माहिती ते संसद परिसरात पत्रकारांना देत असतात. ताज्या नोटिशीबाबत गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले की, "" या नोटिशीला निवडणुकांशी जोडू नका. एखाद्या संसद सदस्याच्या नागरिकत्वाबाबत दुसऱ्या संसद सदस्याकडून तक्रार आली तर गृहमंत्रालयाला त्याची चौकशी करावीच लागते.'' 

स्वामी यांनी राहुल यांच्या नागरिकत्वाबाबत तपासाची मागणी करणारी दोन पत्रे केंद्राला पाठविली होती. 21 सप्टेंबर 2017 रोजी त्यांनी पहिले पत्र पाठविले त्याचे फारसे काही झाले नाही. मात्र त्यांनी कालच (ता.29) आणखी एक तक्रारपत्र पाठविले. मोदी सरकारने त्यावर राहुल यांना नागरिकत्वाबाबतचा खुलासा करणारे उत्तर मागविणारी नोटीस धाडली आहे. गृह मंत्रालयाचे निर्देशक ( नागरिकता विभाग) बी. सी. जोशी यांच्या सहीने राहुल यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

अमेठीतूनही तक्रार 

राहुल यांना नोटिशीला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. भाजप गेली पाच वर्षे जंगजंग पछाडत असलेल्या अमेठी मतदारसंघातील ध्रुव लाल नामक एका अपक्ष उमेदवारानेही काही दिवसांपूर्वी असेच सवाल करून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत हा स्वामी यांचा दावा खरा सिद्ध झाला तर गांधी यांची उमेदवारीही रद्द होऊ शकते असा भाजपचा दावा आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वापासून सारे काही संदिग्ध व संशयास्पद आहे, असे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी म्हटले आहे.

ब्रिटिश कंपनीचे संचालक 

स्वामी यांनी तक्रारीसाठी ब्रिटनमधील "बॅकॉप्स' नामक कंपनीचा आधार घेतला आहे, त्यांनी म्हटले आहे की, "51- साउथगेट स्ट्रीट, विंचेस्टर, हॅम्पशायर असा पत्ता असलेल्या या कंपनीचे राहुल गांधी संचालक व सचिवही आहेत.

या कंपनीच्या नोंदणीपत्रात राहुल गांधी यांनी आपण ब्रिटिश नागरिक आहोत, असे शपथपत्र दिले आहे. या कंपनीने 10-10-2005 व 31-10-2006 रोजी जी कर विवरणपत्रे ब्रिटन सरकारला सादर केली त्यात त्यांची जन्मतारीख 19-06-1970 अशी आहे. त्यातच गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही संदिग्धता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi gets Notice from Home Ministry