Loksabha 2019 : 'अमेठी परिवारा'ला राहुल गांधी यांचे पत्र

पीटीआय
शनिवार, 4 मे 2019

राहुल गांधी यांनी लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पक्षाच्या अध्यक्षांचा संदेश कार्यकर्ते अमेठीतील घरोघरी जाऊन पोचविणार आहेत. 

- अंशू अवस्थी, प्रवक्ते, उत्तर प्रदेश कॉंग्रेस 

लखनौ : "भाजप सरकारमुळे अमेठीची जी विकासकामे बंद आहेत, ती सुरू करण्याची संधी कॉंग्रेसला द्यावी,'' असे भावनिक आवाहन कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीतील मतदारांना शुक्रवारी केले.

अमेठी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सोमवारी (ता. 6) होणार आहे. कॉंग्रेसच्या या परंपरागत मतदारसंघातून राहुल गांधी तीन वेळा निवडून आले आहेत. यंदाही ते रिंगणात आहेत. "अमेठी परिवारा'तील सदस्यांना उद्देशून त्यांनी लेखी पत्र लिहिले आहे. ""ठाम भूमिका घेणे, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांचा आवाज उठविण्यासाठी मला तुमच्याकडून बळ मिळते,'' असे त्यांनी म्हटले आहे.

"केंद्रात कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर अमेठीतील ज्या योजना भाजपने बंद केल्या होत्या, त्या तातडीने सुरू करण्यात येतील, असे वचन मी तुम्हाला देतो. परिवारातील या सदस्याला पुन्हा निवडून देण्यासाठी 6 मे रोजी मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहनही राहुल यांनी पत्रातून केले आहे.

ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात भाजप मतदारांना त्यांच्याकडे वळविण्यासाठी खोटे बोलण्याचा कारखानाच सुरू करतो आणि पैशाचा नदी वाहिली जाते, हे माझ्या "अमेठीच्या परिवाराला' चांगलेच माहीत आहे. अमेठीचे बळ हे प्रामाणिकपणा, एकात्मता आणि साधेपणा यात आहे, याची जाणीव भाजपला नाही. कॉंग्रेसच्या व्यवस्थेत जनताच कंपन्यांच्या मालक असतात. तर भाजपच्या कारभारात अनिल अंबानी मालक असतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi Letter to Amethi Family