Loksabha 2019 : राज ठाकरे यांनाच सर्वाधिक 'टीआरपी' 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

राज यांच्या भाषणाला वृत्तवाहिन्यांवर किती "टीआरपी' मिळतो, याची आकडेवारीच ऍड्‌. शेलार यांनी भर सभेत मांडली. शेलारांनी दाखवलेल्या आकडेवारीद्वारे भाजपला काय साध्य करायचे होते, असा प्रश्‍नच आता उपस्थित होत आहे. 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच खासगी वृत्तवाहिन्यांचा सर्वाधिक टीआरपी मिळत असून आमच्या सरकारने माध्यमांची गळचेपी केली असती तर हे कसे काय शक्‍य झाले असते, असा दावा भाजपचे मुंबई विभागीय अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी करताना अप्रत्यक्षपणे राज ठाकरेच भारी असल्याचे मान्य केले आहे. शेलारांच्या या दाव्यामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.

राज यांच्या "लाव रे तो व्हिडिओ'ला उत्तर देण्यासाठी ऍड्‌. शेलार यांनी शनिवारी (ता. 27) "बघा हा व्हिडिओ' कार्यक्रम घेतला. पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारने पाच वर्षांत प्रसारमाध्यमांची गळचेपी केली केली असून सर्वांचा आवाज दाबून टाकल्याचा आरोप राज यांनी केला होता. त्यांचा हा दावा खोटा असल्याचे दाखवण्यासाठी शेलार यांनी गेल्या 20 दिवसांत कोणत्या नेत्याला किती वेळ वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आले, त्याचा तपशील जाहीर केला.

राज यांच्या भाषणाला वृत्तवाहिन्यांवर किती "टीआरपी' मिळतो, याची आकडेवारीच ऍड्‌. शेलार यांनी भर सभेत मांडली. शेलारांनी दाखवलेल्या आकडेवारीद्वारे भाजपला काय साध्य करायचे होते, असा प्रश्‍नच आता उपस्थित होत आहे. 

पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधात राज यांनी 6 ते 26 एप्रिलपर्यंत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. 20 दिवसांत वृत्तवाहिन्यांनी राज यांना दोन हजार 600 मिनिटे वाहिनीवर दाखविले. दिवसातून 130 मिनिटे राज ठाकरे वाहिन्यांवर झळकायचे; तर प्रत्येक तासाला 25 मिनिटांतील पाच मिनिटे राज ठाकरे वाहिन्यांवर दिसत होते, असे शेलार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Rally have good TRP says Ashish Shelar