Loksabha 2019 : वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी : आठवले

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

बारामती मतदारसंघात यावेळी परिवर्तन होणार असून, काचंन कुल निवडून येतील.

पुणे : वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा आम्हालाच होईल. बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (बुधवार) लगावला. 

महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, विजय काळे, चंद्रकांत मोकाटे, अजय भोसले, रिपाइंचे शहारध्यक्ष अशोक कांबळे आदी उपस्थित होते. त्यावेळी आठवले बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात तिसरी आघाडी यशस्वी होत नाही. मी सगळ्या आघाड्यांमध्ये जाऊन आलो आहे. त्यामुळे वंचित आघाडीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर किंचितही परिणाम होणार नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनीही भाजपसोबत यावे, त्यांनाही मंत्रिपद मिळू शकते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद मिटला. पण माझा आणि प्रकाश आंबेडकरला वाद असाच आहे. ते माझा एवढा तिटकारा का करतात हे माहीत नाही, असेही आठवले म्हणाले.

कांचन कुल येणार निवडून

बारामती मतदारसंघात यावेळी परिवर्तन होणार असून, काचंन कुल निवडून येतील. गेल्यावेळी महादेव जानकरांनी कमळ चिन्ह घेतले असते तर पवारांचा बुरूज ढासाळला असता. यावेळी महाराष्ट्रात महायुतीच्या 40 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. 
राज ठाकरेंच्या सभांचे इव्हेंट मॅनेजमेंट चांगले असते. मात्र, त्यांच्या सभांचा आमच्या मतांवर होणार नाही.

चलन बदलण्याचे डॉ. बाबासाहेबांनी शिकवले 

काळ्यापैशाला आळा घालण्यासाठी 10 वर्षातून एकदा चलन बदलण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवले होते. मोदींनी बाबासाहेबांच्या मार्गावर जात नोटबंदी लागू केली. काँग्रेसने जीएसटीला पाठिंबा दिला. जीएसटीमध्ये चार-पाच वेळा मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत, असेही आठवले म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale Criticizes on Prakash Ambedkar Party Vanchit Bahujan Aghadi