Loksabha 2019 : शरद पवारच खरे 'स्टार प्रचारक'; वयाच्या 79 वर्षी घेतल्या 78 सभा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरात 87 सभा घेत उच्चांक गाठला. धनंजय मुंडे (डीएम) यांच्याही 80 सभा झाल्या. शरद पवार यांच्या 78 सभा झाल्या. वयाच्या 79 वर्षी पवार यांच्या 78 सभा झाल्या.

मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरात 87 सभा घेत उच्चांक गाठला. धनंजय मुंडे (डीएम) यांच्याही 80 सभा झाल्या. शरद पवार यांच्या 78 सभा झाल्या. वयाच्या 79 वर्षी पवार यांच्या 78 सभा झाल्या, हे यातील विशेष. या वयात एवढी धावपळ करणारा दुसरा नेता देशातही नाही. नेत्यांच्या फक्त मोठ्या जाहीर सभा यात मोजल्या आहेत. निवडणूक काळातील बैठका,  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन यांचा यात समावेश नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपसह शिवसेनेच्या उमेदवारांसाठी जवळपास सर्व मतदारसंघात जोरदार सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक सभेला त्यांनी उपस्थिती लावली. युतीचा एकत्रित प्रचार कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या मतदारसंघात  झाला. त्याचा समारेप मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्याच नाशिक मतदारसंघात काल केला. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सभा घेतलेले फडणवीस हे एकमेव नेते ठरले. त्यांनी बडोदा येथीही  भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी एक सभा घेतली.  यानंतर पुढील टप्प्यात ते उत्तर प्रदेशमध्येही काही सभा घेणार असल्याचे समजते.

त्याखालोखाल मुंडे यांनी 21 मतदारसंघात 80 सभा घेत फड गाजवला. त्यांनी काॅंग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे उमेदवार सुप्रिया सुळे, पार्थ पवार अशा व्हीआयपी मतदारसंघातही जोरदार बॅटिंग केली. वर्ध्यापासून ते रायगडपर्यंत ते फिरले. याशिवाय बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत येथे भाजपला आव्हान दिले. 

सर्वात विशेष बाब ही शरद पवार यांची. लोकसभा निवडणुकीच्या चारही टप्प्यांत पवार यांनी 78 सभा घेतल्या. त्यांचाही हेलिकाॅप्टर प्रवास भरपूर झाला. बारामतीहून नाशिक, नाशिकहून रायगड असे मतदारसंघ ते गाठायचे. नगर, माढा, कोल्हापूर या मतदारसंघांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले. रोज किमान तीन सभा त्यांनी घेतल्या. या काळात हैदराबादमध्ये जाऊन त्यांनी चंद्राबाबू नायडूंसोबत पत्रकार परिषद घेतली. 

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दुसरे स्टार प्रचारक छगन भुजबळ यांच्या तीस सभा राज्यात झाल्या. भाजपकडून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याही सभांना मोठी मागणी होती. त्यांनी राज्यात 35 सभा घेतल्या. याशिवाय बीडमध्ये स्वतःच्या मतदारसंघात 70-75 छोट्या-मोठ्या सभा, बैठका त्यांनी घेतल्या. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वाधिक काळ मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ यांच्या प्रचारावर लक्ष केंद्रीत करावे लागले. तरी त्यांनी बारामती, शिरूर, रायगड, बीड, परभणी, माढा या मतदारसंघात सभा घेतल्या. त्यांनी नगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्याविरोधात प्रचार सभा घेतली नाही, याचीच चर्चा जास्त झाली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा, गोंदिया, नांदेड, अकलूज, नगर, पिंपळगाव बसवंत, नंदुरबार, मुंबई, औसा (लातूर) अशा नऊ सभा घेतल्या. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन सभा घेतल्या. त्यात औसा आणि मुंबई येथील सभांत हे दोन्ही नेते एकत्र होते.  

काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई, नांदेड, चंद्रपूर, धुळे, संगमनेर, वर्धा, नागपूर या शहरात सभा घेतल्या. धुळे येथील त्यांची सभा निवडणूक जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी झाली होती. त्यांनी निवडणूक काळात पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नांदेड, सोलापूर, हातकणंगले, पुणे, रायगड, पनवेल,  मुंबई आणि नाशिक अशा आठ ठिकाणी सभा घेतल्या. त्यांच्या सभा कमी असल्या तरी त्यांची चर्चा सर्वाधिक झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 24 सभा घेतल्या. त्यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी एकही स्वतंत्रपणे सभा घेतली नाही. त्यांच्या सभा फक्त शिवसेनेच्या उमेदवारांसाठी झाल्या.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगली, बारामती, जालना आणि नागपूर या मतदारसंघांत मिळून चार सभा झाल्या. त्यांच्या विदर्भातील दोन सभा अचानक रद्द झाल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar is Real Star Campaigner taken 78 Public Rally