Loksabha 2019 : बंगालमधील हिंसाचाराचे गालबोट; चौथ्या टप्प्यात 64.4 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

आज सायंकाळी सहापर्यंत लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात 64.04 टक्के मतदान झाले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राजकीय वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकले असून, या टप्प्यात आज सायंकाळी सहापर्यंत 64.04 टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशात सप-बसपच्या महाआघाडीने उभे केलेले आव्हान, तर आर्थिक राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात वर्चस्व राखण्यासाठी भाजप-शिवसेना युती विरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा रंगलेला संघर्ष, हे या टप्प्याचे वैशिष्ट्य होते. पश्‍चिम बंगालमधील काही ठिकाणी मतदानादरम्यान हिंसाचाराच्या काही घटना घडल्या.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 69.50 टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात 69.1 टक्के, तर तिसऱ्या टप्प्यात 68.40 टक्के मतदान झाले. त्या तुलनेत आज झालेले 64.04 टक्के मतदान पाहता चौथ्या टप्प्यामध्ये पहिल्या तीन टप्प्यांच्या तुलनेत मतदारांचा उत्साह कमी झाल्याचे चित्र दिसून आले. अर्थात, ही अंतरिम आकडेवारी असून, त्यात बदल होईल, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनाग मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातही अत्यल्प झालेले मतदान, पश्‍चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी आसनसोल मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रामध्ये शिरून सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला जाणे, तसेच झारखंडमध्ये मतदान यंत्राची झालेली तोडफोड यांसारख्या तुरळक घटना वगळता चौथ्या टप्प्यात एकंदरीत शांततेत मतदान पार पडले. आसनसोलमध्ये बाबूल सुप्रियो यांच्या गाडीची मोडतोड झाल्याचाही प्रकार घडल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

तिसऱ्या टप्प्यात एकूण 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान पूर्ण झाले होते. आज महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यांमध्ये अंतिम टप्प्यातील मतदान झाले. यामुळे मतदान पूर्ण झालेल्या राज्यांची संख्या 24 वर पोचली आहे. तर, आज 72 जागांसाठी झालेल्या मतदानासोबतच लोकसभेच्या एकूण 543 पैकी 373 जागांसाठीचे मतदान पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात 91, दुसऱ्या टप्प्यात 95, तर तिसऱ्या टप्प्यात 115 उमेदवार रिंगणात होते. आज मध्य प्रदेशात लोकसभेसोबतच मुख्यमंत्री कमलनाथ लढत असलेल्या छिंदवाडासह सहा विधानसभा मतदार संघांमध्येही पोटनिवडणूक झाली. तर, ओडिशा विधानसभेच्या शिल्लक 42 जागांसाठीही मतदान झाले. जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनाग मतदारसंघामध्ये या टप्प्यात कुलगाम जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांमधील मतदानाचे प्रमाण एकूण 10.5 टक्के असे निराशाजनक होते. तुलनेने पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे 76.44 टक्के मतदान झाले. 

एकूण टक्केवारी एकूण (अंतरिम) - 64.04 टक्के 

बिहार - 58.92 टक्के 
महाराष्ट्र - 58.23 टक्के 
राजस्थान - 64.5 टक्के 
ओडिशा - 68 टक्के 
उत्तर प्रदेश - 57.58 टक्के 
पश्‍चिम बंगाल - 76.44 टक्के 
मध्य प्रदेश - 65.77 टक्के 
झारखंड - 63.77 टक्के 

उत्सुकता निकालाची 
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात अनेक चर्चेतील चेहऱ्यांचे भाग्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले. यासोबतच राज्यातील मतदान प्रक्रिया संपली असून, आता संभाव्य निष्कर्षांबाबत राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. तर, 23 मेस जाहीर होणाऱ्या अंतिम निकालांची उत्सुकता वाढली आहे. राज्यात अखेरच्या टप्प्यात 17 जागांसाठी 33314 मतदान केंद्रांवर 58.23 टक्के मतदान झाले. गेल्या वेळी म्हणजे 2014 च्या निवडणुकीत 55.5 टक्के मतदान झाले होते. या वेळी मुंबई आणि अन्य भागांत मतदान वाढल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixty Four percent voting in the fourth phase of the country