Loksabha 2019 : राहुल गांधींचे भाषण म्हणजे निव्वळ मनोरंजन : मुख्यमंत्री

विकास गाढवे
शनिवार, 13 एप्रिल 2019

- राहुल गांधीचे भाषण म्हणजे निव्वळ मनोरंजन

- वास्तवाशी संबंध नसतो त्यांच्या भाषणाचा.

लातूर : राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे टिव्हीवरील काल्पनिक मालिकेसारखे आहे. काही दिवसानंतर त्यांच्या भाषणापूर्वी मालिकेपूर्वी दाखवली जाणारी सूचना पाहायला मिळेल. त्यांच्या भाषणाचा वास्तवाशी काहीही संंबंध नसून, त्यांचे भाषण म्हणजे निव्वळ मनोरंजन आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लातूर लोकसभा निवडणुकीतील भाजप - शिवसेना युतीचे उमदेवार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारासाठी शनिवारी (ता. १३) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, राज्य कृषी मुल्य  आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, रमेश कराड, माजी आमदार गोविंद केंद्रे नागनाथ निडवदे व चंद्रकांत चिकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले, ''काँग्रेसकडून साठ वर्षापासून गरीबी हटावचा नारा दिला जात आहे. मात्र, गरीबी हटली नाही. आता दरवर्षी ७२ हजार रूपये देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.  हे पैसे कोठून येणार व नेमके कोणाला देणार, हे त्यांनाच माहीत नाही. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात गरीबी हटवण्यासाठी सामान्यांच्या विकासाच्या विविध योजना आणल्या आहेत. ३४ कोटी सामान्य लोकांची बॅंकेत जनधन खाती उघडली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते, की दिल्लीहून पाठवलेल्या एक रूपयापैकी सामान्यांच्या हाती केवळ १५ पैसे पडतात. ८५ पैसे व्यवस्था व त्यातील दलाल हडपतात. आता नरेंद्र मोंदी यांच्यामुळे दिल्लीहून पाठवलेली सर्व रक्कम सामान्यांच्या बँक खात्यावर पडत आहे. व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपवण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाले आहे.

'स्वच्छ भारत मिशन'मधून ९८ टक्के लोकांना स्वच्छतागृह तर 13 कोटी कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला आहे. सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले असून, नव्याने सर्वेक्षण करून सर्व बेघर कुटुंबांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ही निवडणूक राष्ट्रीय अस्मिता व सुरक्षेची असून देश कोणाच्या हातात द्यायचा, याचा विचार करायला लावणारी आहे. पायाखालची वाळू  घसरली की लोक धमक्या देतात. मात्र, प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद असलेली वानरसेनाच रावणाला संपवते. रामनवमीनिमित्त मतदारांनी मतदानरूपी बाणातून कॉंग्रेससारख्या रावणाला धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

...तेव्हाच्या नेतृत्वात ताकद नव्हती

भारतीय सैन्यात पूर्वीपासून दुश्मनाशी दोन हात करण्याची ताकद आहे. मात्र, नेतृत्व कमकुवत असल्यानेच सैन्याला दुश्मनाला धडा शिकवता आला नाही. मुंबईवर हल्ला झाल्यानंतर केवळ निषेध व चर्चा झाल्या. आता कणकर नेतृत्वामुळेच सैन्याला आपले सामर्थ जगाला दाखवता आले आहे.

पाकिस्तान कुत्र्याची शेवटी

पाकिस्तान ही कुत्र्याची शेपटी असून, काँग्रेसकडून देशद्रोही तसेच दहशतवादाला रोखण्यासाठीचे कायदे संपवण्याची भाषा केली जात आहे. देश धर्मशाळा नाही. काही झाले तरी देश राहिला पाहिजे. सुरक्षित व विकसित भारतासाठी सर्वांनी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन ही फडणवीस यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speech of Rahul Gandhi is only for Entertainment says Devendra Fadnavis