Loksabha 2019 : लोकसभा लढविण्यास सुमित्रा महाजन यांचा नकार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

- सलग आठवेळा लोकसभेच्या खासदार.

भाजपच्या धोरणामुळे निर्णय घेतल्याची चर्चा सध्या सुरु

 

इंदूर : मी आता लोकसभा निवडणूक लढविणार नाही. इंदूरमधील उमेदवारीबाबत आता पक्षाला जो निर्णय योग्य वाटतो तो घेऊ शकतो, असे लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज (शुक्रवार) स्पष्ट केले. याबाबतचे पत्र सुमित्रा महाजन यांनी प्रसारमाध्यमांना लिहिले आहे.
 
सुमित्रा महाजन यांनी सलग आठवेळा इंदूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये त्यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक अशी सुमित्रा महाजन यांची ओळख आहे. आता त्यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने इंदूरमधून भाजपकडून आता कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या धोरणामुळे निर्णय?

भाजपने 75 वर्षांवरील नेत्यांना उमेदवारी न देण्याचे धोरण निश्चित केले. त्यामुळे या धोरणानुसारच पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. यामध्ये भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी यांच्यासह काही नेत्यांना वगळण्यात आले. त्यानंतर आता खुद्द सुमित्रा महाजन यांनीच निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने भाजपसमोरील पेच सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sumitra Mahajan will not contest Lok Sabha Election from indore Constituency