Loksabha 2019 : संकटग्रस्त राज्यांसाठी एक हजार कोटींचा निधी : पंतप्रधान

पीटीआय
शनिवार, 4 मे 2019

फणी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांना मदत करण्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संकटाच्या काळात सरकार नागरिकांबरोबर आहे, असे मोदी येथील प्रचार सभेत बोलताना म्हणाले. 

हिंडौन शहर (राजस्थान) : फणी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांना मदत करण्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संकटाच्या काळात सरकार नागरिकांबरोबर आहे, असे मोदी येथील प्रचार सभेत बोलताना म्हणाले. 

शुक्रवारी सकाळी ओडिशाच्या किनागरपट्टीला फणी चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर विशेष बैठकीत आपल्याला परिस्थितीची माहिती देण्यात आल्याचे मोदींनी या वेळी सांगितले. राजस्थानातील हिंडौन येथील भाजपच्या प्रचार सभेत बोलताना मोदींनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की ओडिशा, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि पद्दुचेरीतील लाखो नागरिकांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे.

चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांतील सरकारांशी केंद्र सरकार संपर्क ठेवून आहे. गुरुवारीही आढावा बैठक घेण्यात आली होती. संकटग्रस्त राज्यांच्या मदतीसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राने उपलब्ध करून दिला आहे. 

विरोधकांवर टीकास्त्र

या वेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ""देशाच्या सुरक्षेचे विरोधी पक्षांना काहीही देणे घेणे नाही. "जैशे-मोहम्मद'चा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या वेळेवरून विरोधक टीका करत आहेत, हे दुर्दैवी आहे,'' असे मोदी म्हणाले. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही मोदींनी या वेळी टीकास्त्र सोडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousand Crores funding for distressed states says Narendra Modi