Loksabha 2019 : भाजपचे उदित राज काँग्रेसमध्ये दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

भाजपला दलित मते हवी आहेत; पण दलित नेता नको. त्यांना मुका आणि बहिरा दलित नेता हवा. 
- उदित राज, भाजपचे माजी नेते.

नवी दिल्ली : भाजपने वायव्य दिल्लीतून उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त झालेले दलित नेते उदित राज यांनी आज कॉंग्रेसचा "हात' धरला. प्रवेशाच्या वेळी त्यांनी भाजपवर कडवट शब्दांत टीकाही केली.

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत खासदार झालेल्या उदित राज यांना याही वेळेस भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, भाजप नेतृत्वाने अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना झुलवत ठेवून हंसराज हंस यांना उमेदवारी दिली. यामुळे अपक्ष लढण्याची संधीही हिरावली गेल्याने नाराज उदित राज यांनी कॉंग्रेसचा दरवाजा ठोठावला होता. आज सकाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर दुपारी कॉंग्रेस मुख्यालयामध्ये दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षा व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, संघटना सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत उदित राज यांनी औपचारिकरीत्या कॉंग्रेस प्रवेश केला. कॉंग्रेसनेही पायघड्या अंथरताना "उदित राज यांच्या मदतीने आतापर्यंत न जिंकलेल्या जागा कॉंग्रेस जिंकेल,' अशा शब्दांत त्यांचे स्वागत केले.

ऍट्रॉसिटी कायदा मवाळ झाल्यानंतर रस्त्यावर उतरलेल्या दलितांना पाठिंबा दिल्यामुळे आपल्याला भाजप नेतृत्वाने डावलले, असा हल्ला उदित राज यांनी केला. मुका, बहिरा राहणाऱ्याला भाजप, संघाकडून पंतप्रधानही बनवले जाईल अशी टीका करताना, भाजपमध्ये मौनी बनून राहिलो असतो तर मलाही मोठे पद मिळाले असते, असा दावा उदित राज यांनी केला. 

भाजपला दलित मते हवी आहेत; पण दलित नेता नको. त्यांना मुका आणि बहिरा दलित नेता हवा. 
- उदित राज, भाजपचे माजी नेते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udit Raj left BJP and join Congress